नागपुरात ४ तास ढगफुटी सदृश्य पाऊस २ महिलांचा मृत्यू ; १४ जनावरे दगावली

– अनेक घरात पाणी शिरले

– ४०० जणांना सुरक्षित स्थळी पोहचविले

– दुपारपर्यंत परिस्थिती पूर्व पदावर

– उपमुख्यमंत्र्यांचे परिस्थितीवर लक्ष : मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या भेटी

नागपूर :- शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून १४ जनावरे दगावली आहेत.

शनिवारी रात्री २ वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला सतत दोन तास विजांचा कडकडाटासह ४ तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या २ तासांमध्ये ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.

या परिस्थितीचा सामना करण्याकरिता उपमुख्यमंत्रीफडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने पावले उचलली. शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्करांचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्‌हयातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. ४०० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.

या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (७० वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (८० वर्षे) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे ५ पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वार रुममधून परिस्थितीचा आढावा घतला. शहरातील विविध भागांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात या उभय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागासही जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते.

दरम्यान, मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’(सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डिजिटल भुगतानों पर लेनदेन शुल्क में छूट तथा डिजिटल पेमेंट प्रमोशन बोर्ड गठित करने की माँग की कैट ने

Sat Sep 23 , 2023
नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के डिजिटल पेमेंट को ज़्यादा से ज़्यादा करने के आह्वान तथा जी 20 द्वारा एमएसएमई सेक्टर को डिजिटल अर्थव्यवस्था से जोड़ने के निर्णय को अमली जामा पहनाने की दृष्टि से कन्फ़ेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कैट) ने आज केंद्रीय आई टी मंत्री अश्विनी वैष्णव तथा वित्त मंत्री निर्मला सीथारमन से पुरज़ोर आग्रह किया है […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!