सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे ;शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

– पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक

पुणे दि. 5 : शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धाना 25 टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर उषा ढोरे, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, नवीन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी काही काळ दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.  पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढवावे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णालयांना व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत.

            जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी कोवॅक्सिन लसमात्राचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. कोवॅक्सिन लशीचा पुरवठा होण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ज्येष्ठांना ग्रामीण भागात वर्धक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यास अडचण येत असल्याने शिबिराच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

            बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर  26.60 टक्के होता आणि 7 दिवसात 45 हजार 788 नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यापेक्षा हे प्रमाण 44.75 टक्क्यांनी कमी आहे. मागील आठवड्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 37 टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात एकूण 1 कोटी 62 लाख 67 हजार लसीकरण झाले आहे. 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 32 टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

            बैठकीस आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पुणे वन विभागात वनसंरक्षणासाठी तीन वाहने दाखल

Sat Feb 5 , 2022
 पुणे दि. 5 : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वन विभागासाठी घेण्यात आलेल्या  तीन वाहनांना विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.             या वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार असून वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत  निधी उपलब्ध करण्यात आला आहे. Follow us on Social Media x […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!