– महायुतीचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नांदेड :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत गरीब कल्याण कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याबरोबरच सर्वांगीण विकास करून देशाला आत्मनिर्भर बनविले आहे. मोदी सरकारच्या सहकार्याने नांदेडसह मराठवाड्याचा चौफेर विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे गुरुवारी केले.
नांदेड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील – चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण , राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा.डॉ.अजित गोपछडे तसेच भाजपा चे आमदार , महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नांदेड मधून प्रतापराव पाटील – चिखलीकर यांनी मागच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांना मात दिली होती. मात्र यंदा ते भाजपाचे राज्यसभेतील खासदार असल्याने याबाबतचा विशेष उल्लेख फडवणीस यांनी केला. खा. अशोक चव्हाण यांच्या साथीने प्रतापरावांना बुस्टर डोस मिळाल्याचे नमूद करत त्यांना यंदा 50 टक्क्यांच्या पेक्षा अधिक मते मिळतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रतापराव चिखलीकर यांचे मतदार संघातील कार्य हे विकासाचेच कार्य राहिले आहे. अशोकरावांनीही विकासासाठीच मोदीजींना पाठिंबा दिला. पक्षानेही नेहमीच विकासाचा अजेंडा राबविला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला . ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारा भारत शस्त्रे-क्षेपणास्त्र, अंतराळ यान याबाबत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंपूर्ण झाला. गेल्या 75 वर्षात ज्यांच्या घरात पाणी नव्हते त्या 50 कोटी जनतेच्या दारात पाणी पोहोचविण्याचे काम मोदीजींनी केले. देशातील निम्मी लोकसंख्या – महिला गेल्या 10 वर्षात मुख्य प्रवाहात आल्या.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून अहोरात्र झटणारा प्रतापराव हा देशातील एक निराळा खासदार आहे. आपल्या भागातील विकासासाठी सरकारदफ्तरी पाठपुरावा करणारे चिखलीकर जनतेसाठी कायम उपलब्ध असणारे नेतृत्व आहे. खा. अशोक चव्हाण म्हणाले की, प्रतापराव आणि मी एकेकाळी एकत्र काम केले आहे. नरेंद्र मोदीच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नांदेडशी संबंधित पाच खासदारांची वज्रमूठ आहे. मोठा बंधू म्हणून मी स्वत: प्रतापरावांबरोबर आहे, अशी ग्वाहीही खा. चव्हाण यांनी दिली .