नागपूर :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचयात स्तरावर विविध वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक स्वरुपाचे कामे केली जातात. मनरेगा अंतर्गत सध्या राज्यात 38 हजाराहून अधिक कामे सूरु आहेत. कळमेश्वर तालुक्यातील म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतीअंतर्गत चालू असलेल्या काही कामांना मनरेगा आयुक्त शान्तनु गोयल, (भाप्रसे ) यांनी आकस्मिक भेट दिली.सदर भेटी दरम्यान आयुक्तांनी म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवड, पेव्हर ब्लॉक, पांधन रस्ता, फळबाग लागवड, गुरांचा गोठा या कामाची पाहणी केली तसेच कामावरील उपस्थित मजुरांसोबत संवाद साधला. याप्रसंगी महात्मा गांधी नरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध कामांची माहिती देऊन त्यांनी या कामांचा लाभ घ्यावा यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आयुक्तांसोबत कळमेश्वर तालुक्याचे गट विकास अधिकारी महेश्वर डोंगरे, म्हसेपठार ग्रामपंचायतीचे सरपंच संजय कुबडे, लोहगड ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र दहाट व मनरेगाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.