संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी विधानसभा मतदार संघात विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्य असे दोन आमदार या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करीत आहेत मात्र मागिल तीन वर्षांचा काळ लोटला तरीही आमदार टेकचंद सावरकर यांना कामठी पंचायत समितीच्या वार्षिक आंमसभेची आठवण झाली नसल्याने आमदार टेकचंद सावरकर यांना पडला कामठी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेचा विसर अशी चर्चा रंगत आहे.
कामठी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व विभागातील विकास कामांचा आढावा घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव करणे व रखडलेल्या कामांना चालना देण्यासाठी तत्कालीन आमदार पंचायत समितीची वार्षिक आमसभा घेत होते मात्र मागिल तीन वर्षांपासून कामठी पंचायत समिती मध्ये अशा प्रकारच्या वार्षिक आमसभा झाले नसल्याचे दुर्दैव आहे.पंचायत समिती अंतर्गत शिक्षण, आरोग्य, बांधकाम,कृषी,पंचायत,महिला बालकल्याण,रोजगार हमी योजना यासह इतर विभागाचा समावेश असतो या सर्व विभागामार्फत वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा सभेत घेतला जातो.
सदर सभेचे अध्यक्ष म्हणून संबंधित विभागाचे आमदार हे असतात आणि या सभेला पंचायत समिती सभापती, उपसभापती,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तथा संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित असतात.या सभेत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आपापल्या गट व गणामध्ये येत असलेल्या अडीअडचणी व समस्या मांडतात व त्या सोडविण्यासाठी सभेचे अध्यक्ष आमदार हे योग्य तो उपाय सांगून रखडलेली कामे सुरू करण्याचे प्रयत्न करतात .तसेच वर्षभरात जे अधिकारी, कर्मचारी उत्कृष्ट कामे करतात अशा कर्मचारी अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मानही होतो अशा महत्वपूर्ण सभेचा आमदार टेकचंद सावरकर यांना विसर पडतो याचे आश्चर्यच वाटत असल्याने अश्या प्रकारच्या आमसभा घेणे योग्य नाही का?असा प्रश्न उपस्थित होतो.मात्र या आमसभा घेणे सुरू झाल्यास तालुक्यातील विकास कामांना चालना मिळुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळेल.जे कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करतात तेही वेगाने कामे करून पंचायत समिती मधील विकास कामांना गती देतील असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.