– मनपा आयुक्तांसोबत बैठकीत मांडले विविध प्रश्न
नागपूर :- नागपूर महानगरपालिका अंतर्गत हुडकेश्वर नरसाळा भागातील विविध समस्यांचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (ता.२५) आढावा घेतला. नागपूर महानगरपालिकेतील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता मनोज सिंग, माजी नगरसेवक भगवान मेंढे आदी उपस्थित होते.
हुडकेश्वर-नरसाळा भागातील गडर लाईन, रिकाम्या प्लॉटवर पाणी साचत असल्यामुळे होणारा त्रास, पाण्याचे अनियंत्रित बील, रहिवासी क्षेत्रात विद्युत खांब, उद्यान, स्वच्छता या विविध विषयांच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे यांनी आढावा घेतला.
हुडकेश्वर – नरसाळा भागात गडर लाईन बांधकाम करणे, हुडकेश्वर – नरसाळा भागातील रिकामे असलेल्या प्लॉटवर पाणी साचत असल्यामुळे प्लॉट धारकावर दंडात्मक कार्यवाही तथा नागरीकांना होत असलेल्या त्रासाचे निराकरण करण्याबाबत त्यांनी सूचना केली. यासंदर्भात रिकाम्या प्लॉटवर जाहिर सूचना लावण्याबाबत आयुक्तांनी प्रशासनाला निर्देश दिले. हुडकेश्वर – नरसाळा भागातील नागरीकांना सरसकट पाणी बिलाच्या दरामध्ये तफावत निर्माण होत असल्याने सुधारीत बिल देण्याबाबत बावनकुळे यांनी सूचना केली. यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना दिले. हुडकेश्वर – नरसाळा भागातील नवीन निर्माण झालेल्या रहिवासी क्षेत्रात आवश्यक इलेक्ट्रीक पोल तथा स्ट्रिट लाईट लावण्याची देखील स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी होत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावर विद्युत विभागाकडून पाहणी करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
हुडकेश्वर – नरसाळा भागातील उद्याने विकसीत करणे, सफाई कर्मचा-यांच्या कामाबाबतही तक्रारींवर कार्यवाही करण्याची सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या सर्व समस्यांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.