नागपूर :- महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२४ च्या मारोतराव नारायणे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून मारोतराव नारायणे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार डॉ. गोविंद काळे (सोलापूर ) यांच्या ‘हिडन मेजरमेंट’ या कांदबरीला जाहीर झाला आहे. मारोतराव नारायणे उत्कृष्ठ कथासंग्रह पुरस्कार रामराव झुंजारे (बुलडाणा) यांच्या ‘सकोन’ कथासंग्रहाला जाहीर झाला असून उत्कृष्ठ वैचारिक साहित्य पुरस्कार मिलिंद कीर्ती (नागपूर ) यांच्या ‘सहमतीची हुकूमशाही’ या वैचारिक व संशोधनपर ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी १०,००० रूपये रोख राशी, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून १५० ग्रंथ प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. महेश खरात, तसेच यवतमाळ येथील प्रसिद्ध कथाकार व कादंबरीकार प्राचार्य डॉ. देवेंद्र पुनसे यांनी तीन उत्कृष्ठ ग्रंथांची पुरस्कारांसाठी निवड केली. मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि.२७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वर्धा येथील सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, पुरस्कार संयोजन समिती सदस्य श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर व सूर्यकांत पाटील यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. पुरस्कारप्राप्त लेखकांचे महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.