– एक लाख तरुणांना रोजगाराचा संकल्प
नागपूर :- मिहानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. सध्या एचसीएल, टीसीएस, इन्फोसीस, टेक-महिंद्रा सारख्या अनेक कंपन्यांनी रोजगाराचे दालन खुले केले आहे. काही कंपन्यांचे काम सुरू झाले आहे, तर काहींनी नागपूरमध्ये उद्योग सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळात मिहान हे विदर्भाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (शनिवार) केले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित ‘रायझिंग नागपूर’ या कार्यक्रमात ना. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या चौफेर विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ‘नागपुरात बुटीबोरी आणि हिंगणा अशा दोन औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये बऱ्याच कंपन्यांनी उद्योगासाठी जागा घेतल्या. पण अद्याप उद्योग सुरू केलेले नाहीत. यासदंर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. मिहानमध्ये मात्र वेगाने काम सुरू आहे. मोठ्या आयटी कंपनीज आल्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. आतापर्यंत ६८ हजार तरुणांना आम्ही रोजगार दिला आणि २०२४ च्या अखेरपर्यंत ही संख्या एक लाखावर नेण्याचा माझा प्रयत्न आहे,’ असेही ना. नितीन गडकरी म्हणाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्या करण्यासाठी विदर्भाच्या बाहेर जाण्याची गरज इथल्या तरुणांना पडणार नाही. आपल्याच शहरात राहून चांगली नोकरी करणे शक्य होणार आहे. बऱ्याच प्रमाणात याची सुरुवातही झालेली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा, उद्यानांचे सौंदर्यीकरण, एग्रो कन्व्हेंशन सेंटर, अजनी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीमोडल हब, दिव्यांगासाठी स्टेडियम, मेट्रोचा विस्तार आदी मुद्दे ना. गडकरी यांनी विस्तृतपणे मांडले. दै. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मिहानमधून थेट आयात-निर्यात
केवळ आयटी म्हणून नव्हे तर विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) असल्यामुळे मिहानमधून थेट आयात-निर्यात होणार आहे. त्यामुळे आणखी एका दृष्टीने नागपूरचे महत्त्व अधोरेखित होणार आहे, असा विश्वास ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. खापरीपासून पुढचा मार्ग आठ लेनचा होईल. त्यासोबतच खापरीजवळ पूल उभा करून थेट व्हीसीएच्या पुढे मेट्रो उतरविण्यात येईल. हा डबल डेकर पूल असेल. वरच्या भागाला मेट्रो, खाली पूल आणि त्याखाली रस्ता असणार आहे. त्यामुळे बुटीबोरीला अत्यंत कमी वेळात पोहोचणे शक्य होणार आहे, असेही ते म्हणाले.