नागपूर :- महानगरात महा मेट्रोरेल ने आपले भव्य जाळे तयार केले. अगदी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारा समोर शासकीय जागेवर मुख्यालय बनविले. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महा मेट्रोरेल कार्पोरेशनच्या विस्तारासाठी विना मोबदला (फुकट) कृषी महाविद्यालयाची दोन एकर ( 7 हजार चौरस मीटर) जागा दिली. ती जागा त्यांना न देता दीक्षाभूमी समोरील व बाजूची सर्व जागा स्मारकास द्यावी अशी मागणी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केली आहे.
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वस्तीगृह अगदी जीर्ण झाले आहे. मुलींसाठी वस्तीगृह नाही. आधीच्या खोल्या अपूर्ण आहेत. पूर्ण विद्यार्थ्यांसाठी अजूनही वस्तीगृह बांधले नाही. मात्र महामेट्रो च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही जमीन काहीही मोबदला न घेता 27 ऑक्टोबर रोजी हस्तांतरित केली त्याचा बसपा ने विरोध केला.
दीक्षाभूमी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित झाले. त्याची ब्ल्यू प्रिंटही तयार आहे. यासाठी जागा अपुरी पडत आहे. दीक्षाभूमी स्मारकाच्या उत्तरेकडील महाराष्ट्र शासनाची (कॉटन रिसर्च सेंटरची) असलेली जागा रस्त्यासाठी मिळावी त्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी सुरू आहे. त्यातील एक इंचही जागा मिळालेली नाही. त्यामुळे चौथे प्रवेशद्वार आजही बंद आहे. दीक्षाभूमीच्या पूर्वेकडील आरोग्य विभागाची, कृषी विभागाची व आयटीआय च्या खुल्या जागेची अनेक वर्षापासून मागणी आहे.
ही जागा स्मारक समितीला दिली जात नाही. उलट भविष्यात दीक्षाभूमी स्मारकाला अडथळा होईल असे महामेट्रोचे मुख्यालय बनवले. आणि पुन्हा त्याच्या शेजारची पावणे दोन एकर जागा काहीही मोबदला न घेता महा मेट्रोला देण्यात आली. महामेट्रोत कुठलेही शासकीय धोरण दिसत नाही, त्यातील भरत्या ह्या जातीय व पक्षपाती दृष्टिकोनातून भरल्या गेलेल्या आहेत. यांचे धोरण बहुजन महापुरुषांच्या विचारधारेच्या विरोधात व त्यांचा अपमान करणारे आहे.
महामेट्रो धंदा करायला निघाली, सर्वसामान्यांना कर्जबाजारी करायला निघाली, लुटायला निघाली अशा वेळेस शासनाने जनहित न जोपासता शासनाची जमीन फुकटात त्यांच्या घशात घालणे अयोग्य आहे. दीक्षाभूमी ला पर्यटन स्थळाचा अ दर्जा मिळाला आहे. परंतु त्या दर्जाचे इथे मागील पन्नास वर्षात काहीही काम दिसत नाही.
त्या दर्जाचे काम व्हावे यासाठी आंबेडकरवादी स्मारक समिती सरकार मधील गांधीवादी व मनुवादी सत्ताधाऱ्यांना बोलवत असते. ते दरवर्षी आश्वासनाची खैरात वाटत असतात. केंद्र व राज्यातील नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस मागील आठवड्यात नेहमीसारखे दीक्षाभूमीवर येऊन गेले. स्मारकासाठी मागणी करूनही त्यांच्याकडून जमिनीच्या संदर्भात काहीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. याचा बहुजन समाज पार्टीने धिक्कार केलेला आहे. कृषीची महा मेट्रोला दिली जाणारी जागा देण्यात येऊ नये. उलट ती संपूर्ण जागा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या स्वाधीन करावी. अशी मागणीही महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केलेली आहे.