नागपूर, ता. १२ : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हील लाईन मुख्यालयातील महापौर कार्यालयात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व दहावी-बारावीनंतर पुढे काय करता येईल याबद्दलची माहिती देण्यासाठी समुपदेशन केंद्र जुलै २०२१ मध्ये सुरू करण्यात आले. या केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपला यामुळे फायदा होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.
जेईई, नीट, सीईटी या प्रवेश परीक्षा पुढील पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांबद्दल पुरेशी माहिती नसते. माहितीअभावी अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना या परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने सदर समुपदेशन केंद्रातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते व त्यांचे समुपदेशन करण्यात येते.
प्रवेश परीक्षा मार्गदर्शनासोबतच दहावी, बारावीनंतर पुढे काय, याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा या केंद्राचा मुख्य हेतू आहे. आतापर्यंत सहा महिन्यात १२० विद्यार्थ्यांनी समुपदेशन केंद्राचा लाभ घेतला. १८ विद्यार्थ्यांना निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्यात समुपदेशन केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रवेशाची अंतिम तारीख गेल्यानंतरही ११ वीत पाच विद्यार्थ्यांना निरनिराळ्या महाविद्यालयांत समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देण्यात आला.
मनपातील समुपदेशन केंद्रामध्ये समुपदेशक उमेश कोठारी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करीत आहेत. कोठारी यांनी सांगितले की, मनपाने उपलब्ध करून दिलेली ही उत्तम सोय असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात याचा मोठा लाभ होईल. समाजात असे अनेक परिवार आहेत ज्यांचे शिक्षण कमी असल्यामुळे किंवा प्रशासकीय कार्यपालन पध्दतीच्या माहितीअभावी त्यांना बराच त्रास होतो. काही मुलांचे वर्षसुध्दा वाया जाते, असे बरेच विद्यार्थी येथे येऊन समुपदेशनाचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. केन्द्र दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत सुरु असते.
विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशातील सर्व व्यावसायिक स्पर्धात्मक परीक्षांबद्दल ज्या काही शंकाकुशंका आणि प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत त्याचे निराकरण करुन समाधान करण्यासाठी विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या समुपदेशन केंद्रात तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाने घेतलेली आहे. ही सर्व सुविधा जनहितार्थ निःशुल्क देण्यात येत असून विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लवकरच नीट प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. या प्रक्रियेच्या माहितीसाठी अथवा कुणाला काही अडचण येत असल्यास समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
विद्यार्थी म्हणतात, समुपदेशन केंद्र उत्तम मार्गदर्शक
नागपुरातील हर्ष देवानंद शेंडे ह्याने बारावीनंतर पुढे काय करायचे यासाठी समुपदेशन केंद्राचा आधार घेतला. बारावीत त्याने ९५ टक्के गुण प्राप्त केले. जेईई आणि नीटची परीक्षा दिली होती. नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने परत एक वर्ष नीट परीक्षेसाठी द्यायचे का, याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी समुपदेशन केंद्राने मदत केली. तेथून मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाच्या आधारे जेईईमध्ये उत्तम गुण असल्याने अभियांत्रिकीत प्रवेश घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याने अभियांत्रिकीत प्रवेश घेतला. यामुळे तो आनंदी असून शिक्षणाबाबत कुठलीही शंका असल्यास मनपाच्या समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा. हे एक उत्तम ठिकाण असल्याचे त्याने सांगितले.
अजिती हुकरे ही सोमलवार हायस्कूलची विद्यार्थिनी दहावीत ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. आर्थिक परिस्थितीमुळे नीट प्रवेश परीक्षा देण्यास असमर्थ होती. पुढे काय, यासाठी ती समुपदेशन केंद्रात आली. योग्य मार्गदर्शनामुळे ती आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमाला शिकते आहे. समुपदेशन केंद्रामुळे करियरच्या दृष्टीने नवी दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया तिने दिली.
कमल अवस्थी या विद्यार्थ्यांने बारावीनंतर मनपातील समुपदेशन केंद्रातील समुपदेशनानंतर बी.एससी. बॉयोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात सिंधी हिंदी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्पूर्वी त्याने बारावीनंतर बीपीएमटी टेक्नीशियन या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय शोधले. मात्र, महाविद्यालय न मिळाल्याने त्याचे वर्ष वाया गेले. त्यानंतर समुपदेशन केंद्राची माहिती मिळाल्याने तो केंद्रात आला. समुपदेशनानंतर त्याला योग्य मार्ग गवसल्याचे तो अभिमानाने सांगतो.
नागपूर महानगरपालिकेच्या एम.ए.के. आझादा शाळेतील वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी सुमैय्या कौसर हिने बारावीत ८५ टक्के गुण मिळवून गुणवंतांच्या यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला होता. पुढे काय, यासाठी तिने समुपदेशन केंद्रातून मार्गदर्शन मिळविले आणि सिंधी हिंदी महाविद्यालयात मनपाच्या सहकार्याने वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविला. समुपदेशन केंद्र म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठीही एक उत्तम मार्गदर्शक असल्याची भावना तिने व्यक्त केली.