नवरात्रोत्सवात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान”

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – डॉ. विपीन इटनकर

नागपूर :-  राज्यात अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या नवरात्रौत्सव कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्वरोग वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घ्यावा व आरोग्य सदृढ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय सर्वरोग वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. रेवती साबळे, डॉ.पारवेकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

अठरा वर्षावरील सर्व महिला माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी सोबतच प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा या शिबिरात उपलब्ध होणार असून सुरक्षित व सुदृढ आरोग्यसाठी समुपदेशही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

या मोहिमेतील उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा यासाठी आशा, अंगणवाडी, आरोग्य सेविका व सेवक घरोघरी जाऊन शिबिराबाबत माहिती देणार आहेत. त्यासोबतच विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभांद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना या अभियानात सहभागी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबिरे घेण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी स्वत: मातांची तपासणी करणार असून आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भित करणार आहेत. तपासणी शिबिर आंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत घेण्यात येणार आहेत. मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या अभियानात नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. महिलांची व दांपत्याची आशा व अंगणवाडी सेविका यांच्या जवळील उपलब्ध यादीनूसार तपासणी करण्यात येईल. गर्भधारणापूर्व काळजी व मार्गदर्शक तत्वे सर्वांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच विशेष सोनाग्राफी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत नागपूर विभागात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा येथे एकूण 17 शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत कमला नेहरु व एल.ए.डी महाविद्यालयात कार्यशाळा

Fri Sep 23 , 2022
नागपूर :-  2 ऑक्टोबर पर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी अंतर्गत सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता प्रस्ताव पाठविणे व ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रितीने कसे प्राप्त करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 20 सप्टेंबर रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com