– ७० मीटर पर्यंत इमारतीवरील आग विझविण्यासाठी अग्निशमन दल होणार सक्षम
नागपूर :- नागपुरातील वाढत्या गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेसाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने ठोस पावले उचलली असून आता ७० मीटर उंचीच्या इमारतींना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये अग्निशमन विभागाचा मास्टर प्लान तयार केला असून यातून अग्निशमन विभागाच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्निशमन विभागात लवकरच मोठया इमारतीवरील आग विझविण्यासाठी ७० मीटर उंचीची हॅड्रोलिक प्लाटफॉर्म मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नागपूर शहरासाठी अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभागाचा मास्टर प्लान मंजूर झाला आहे. या आराखड्यानुसार शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अग्निशमन केंद्रांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील गगनचुंबी इमारतींना लागलेली आग व आपत्कालिन सेवा पुरविण्यासाठी आवश्यक यंत्रणेसह अग्निशमन विभाग सक्षम केला जाणार आहे. तसेच काही अग्निशमन केंद्रांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यावर महापालिकेतर्फे जवळपास २९ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी दिली.
नवे ११ अग्निशमन केंद्रे
नागपूर शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येनुसार शहरात ११ अग्निशमन केंद्र असुन पाचपावली अग्निशमन केंद्राचा व कळमना जलतरण तलावाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. आणखी ११ अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. यात बजाजनगर, अंबाझरी, नरसाळा, मानेवाडा, चिंचभवन, दाभा, वायुसेनानगर, ठाकरे लेआऊट, वांजरा व वांजरी या भागांमध्ये नवी अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. यानंतर शहरातील एकूण अग्निशमन केंद्रांची संख्या २२ वर पोहोचणार असून प्रक्रिया सुरु आहे.
अग्निशमन विभागाच्या नव्या मास्टर प्लानमध्ये प्रामुख्याने गगनचुंबी इमारतींवर सेवा पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सेवेत आणण्यावर भर दिला आहे. यासाठी अग्निशमन विभागाने ७० मीटर हॅड्रोलिक प्लाटफॉर्म मशीन खरेदी केली आहे. याबद्दल आवश्यक प्रशासकीय पूर्तता पूर्ण झाली असून लवकरच ही यंत्रणा अग्निशमन दलाच्या ताफ्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे आता शहरातील एखाद्या ७० मीटर पर्यंत इमारतीतील आग नियंत्रणात आणता येईल तसेच आपत्कालीन स्थिती मध्ये या मजल्यावरील नागरिकांना सुरक्षितपणे खाली आणता येईल. सध्या अग्निशमन विभागाकडे ४२ मीटर उंचीची Turn Table Ladder व ३२ मीटर उंचीची हॅड्रोलिक प्लाटफॉर्म मशीन सेवेत आहे.
शहरात नव्याने सुरू झालेल्या वाठोडा, पुनापूर व पाचपावली अग्निशमन केंद्राकरीता विभागाने १४ नवीन अग्निशमन गाड्या (फायर टेंडर) मंजूर केले आहेत. याची किंमत १६ कोटी ४९ लाख रुपये आहे. यात १६ हजार लिटर क्षमता असलेले ५ फायर टेंडर, ५ हजार लिटर क्षमतेचे ३ व २ हजार लिटर क्षमतेचे ६ फायर टेंडरचा समावेश आहे. लवकरच ही यंत्रणा या अग्निशमन केंद्रांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.