संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मागील चार डिसेंबर पासून बेमुद्दत संपावर आहेत.ज्यामुळे कामठी तालुक्यातील अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे अंगणवाडी केंद्रात जाणाऱ्या लहान मुलांच्या पूर्व शालेय शिक्षणाचे नुकसान होत असून मुलांचा आहार बंद झाला आहे.या बालकांच्या पोषण आहारात खंड पडल्यास बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून अंगणवाडी सुरू कराव्या अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
कामठी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत कार्यरत अंगनवाडी केंद्रातून बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते तसेच पोषण आहार दिला जातो याशिवाय गरोदर माता व तीन वर्षापर्यंतच्या बालकासाठी घरपोच पोषण आहार दिला जातो.अंगणवाडी केंद्रातील काही बालके कमी वजनाचे तर काही बालके तीव्र कमी वजनाचे आहेत.तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बालकांचा पोषण आहार ठप्प झाल्याने कमी वजनाचे व तीव्र बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून अंगणवाडी केंद्र सुरू करावे वा संप सुरू असेपर्यंत बालकांच्या पोषण आहाराचे काम महिला बचत गट तसेच सामाजिक संस्थेकडे द्यावे अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.