– चीनच्या बरोबरीने आणखी एका देशाने उभे राहण्याची जग वाट पाहत आहे, तो एक देश आपल्याला बनायचे आहे – ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह
नवी दिल्ली :- मेक इन इंडिया अभियान भारतापुरते मर्यादित न ठेवता त्याला जागतिक पातळीवर नेण्यासाठी भारतीय उत्पादकांनी जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्याचे आव्हान पेलण्यासाठी तयार राहावे, असे केंद्रीय ऊर्जा, नवी आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी म्हटले आहे. टाइम्स समूहाच्या उत्पादकांसाठी असलेल्या जागतिक प्रसारमाध्यमे महोत्सव 2024 च्या दुसऱ्या आवृत्तीत उपस्थितांना संबोधित करताना सिंह आज नवी दिल्ली इथे बोलत होते.
भारतीय उद्योगांनी देशाबाहेरील बाजारपेठांच्या गरजा लक्षात घेऊन निर्यातीची क्षमता निर्माण करावी, असे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. “कोणताही देश पूर्णपणे स्वावलंबी होऊ शकत नाही, प्रत्येक देशाला काहीतरी आयात करण्याची गरज भासतेच. त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी दर्जा, अंतिम गुणवत्ता आणि उत्पादनात सुधारणा करणे आवश्यक ठरते. मात्र, परवान्याशी संबंधित औपचारिकतेच्या काळात उद्योगजगताने नेमके हे केले नाही,” असे ते म्हणाले.
भारतात येऊन उद्योग उभारण्यासाठी इच्छुक असलेल्यांनाही तशी मुभा देण्यासाठी आपण तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले. जग आज चीनच्या जोडीने आणखी एका देशाने उभे राहण्याची वाट पाहत आहे, तो एक देश आपल्याला बनायचे आहे, असे ते म्हणाले.
ऊर्जा क्षेत्राच्या वाढीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की ऊर्जेची मागणी वाढत असून तिला मेक इन इंडिया मार्फत पुरवठा व्हावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्याकरता प्रचंड उत्पादन क्षमतेची आवश्यकता आहे.