मतदार नोंदणी गतीने करा – विभागीय आयुक्त

Ø नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघाचा आढावा

नागपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी केली जात आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी विविध राजकीय पक्षांनी मतदार साक्षरता व मतदान प्रमाण वाढावे यासाठी उचित समन्वय साधून कामास गती आणावी, असे आवाहन नागपूर विभाग मतदार निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. छायाचित्रासहित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 (अहर्ता दिनांक 1 जुलै 2024 वर आधारित) च्या अनुषंगाने आयोजित प्रथम भेट अंतर्गत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महीरे, सर्व विधासनभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. इटनकर यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रनिहाय सुरु असलेली मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जिल्ह्यात नव्याने तयार झालेले 136 मतदार केंद्र, प्रस्तावित विलीन होणारी मतदान केंद्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान बैठका आदींबाबतही त्यांनी माहिती दिली. श्रीमती बिदरी यांनी मतदार नोंदणीच्या कामामध्ये राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणीं जाणून घेतल्या व त्या दूर करण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी सहाय्यकाची नेमणूक करणे व प्रशासनाच्या समन्वयाने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार संघांमध्ये कमी मतदान झाले आहे तिथे मतदार नोंदणी व मतदान जन-जागृती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवायचा शिल्लक राहू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करता येणार आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचा आहारात समावेश करा - डॉ. देवराव होळी

Sat Aug 10 , 2024
– जील्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन       गडचिरोली :- कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता नैसर्गिकरीत्या आढळून येणाऱ्या रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. रानभाज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्याला आजारापासून दूर ठेवत असल्यामुळे नागरिकांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)व कृषि विभाग, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com