नागपूर, ता. १९: नागपूर शहराचे दोनदा महापौरपद भूषविलेले क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व सरदार अटल बहादूर सिंग यांचे शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्यावर सदर येथील शांतीभवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने नागपूर शहरातील क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील अजातशत्रू हरपला
१४ फेब्रुवारी१९७७ साली पहिल्यांदा त्यांनी नागपूर शहराचे महापौरपद भूषविले. १४ फेब्रुवारी१९७७ ते ६ फेब्रुवारी १९७८ पर्यंत महापौर पदाचा पहिला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये पुन्हा एकदा शहराचे नेतृत्व केले. ३ फेब्रुवारी १९९४ ते १९ जानेवारी १९९५ साली सरदार अटल बहादूर सिंग यांनी दुसऱ्यांदा महापौरपद भूषविले. यापूर्वी १९७४ साली ते उपमहापौर राहिले होते. सरदार अटल बहादूर सिंग यांनी लोकमंच गट तयार केला. या गटाद्वारे ते अपक्ष म्हणून मनपामध्ये निवडून यायचे. त्यांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता.
त्याकाळी नागपूर महानगरपालिकेचे चार प्रमुख स्तंभ मानले जायचे. सरदार अटल बहादूर सिंग, नाना श्यामकुळे, हिंमतराव सरायकर आणि प्रभाकरराव दटके यांनी नागपूर महानगरपालिकेला दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले. वेळेचे नेहमी पालन करणारे व्यक्ती म्हणूनही सरदार अटल बहादूर सिंग यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच मोठ्या नेत्यांशी त्यांचे सौख्य होते. नागपूर विद्यापीठाच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. शहराचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची कन्या कुंदाताई विजयकर यांना शहराची पहिली महिला महापौर बनविण्यात सरदार अटल बहादूर सिंग यांचे मोठे योगदान मानले जाते.
त्यांनी गरीब मनपा विद्यार्थ्यांसाठी शेषराव वानखेडे विद्यानिकेतन सुरु केले. नागपूर शहरात मनपाचे वाचनालय सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला व स्वतःच्या कार्यकाळात अनेक वाचनालय त्यांनी सुरू केले. २०१४ साली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
सरकारने पाठ फिरवली तेव्हा उभा राहिलेला ‘सरदार’
सरदार अटल बहादूर सिंग यांनी १९९४ ला दुसऱ्यांदा महापौरपद ग्रहण केले. त्याच वर्षी नागपूर शहराला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला होता. नागपूर शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यात १० ते १२ लोकांचा मृत्यू सुद्धा झाला. या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे शहराचा खरा ‘सरदार’ म्हणून अटल बहादूर सिंग यांनी कर्तव्य बजावले. त्यांनी महापौर फंड तयार करून त्यात नागपूर शहरातील सेवाभावी नागरिकांकडून निधी गोळा करून तो मृतांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दिला होता.
मनपाचे छत्र हरपले : महापौर दयाशंकर तिवारी
नागपूर नगरीचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने नागपूर महानगरपालिकेचे एक छत्र हरपले. सरदार अटल बहादूर सिंग यांना सर्वकालिक महापौर म्हणून सुद्धा ओळखले जात होते. तीस वर्ष ते नागपूर महानगरपालिकेत होते दोनदा महापौर आणि एकदा उपमहापौरपद त्यांनी भूषवले. विद्यापीठाच्या राजकारणात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर होते. नागपूर महानगरपालिकेच्या स्थापना दिनी शहरातील सर्व महापौरांचा मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी सरदार अटल बहादूर सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या जाण्याचे दुःख नागपूरकरांसोबतच मला सुद्धा आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचे योगदान नागपूर शहर कधी विसरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी अटलबहादूर सिंग : संक्षिप्त परिचय
जन्म २ मार्च १९४२, वडील इक्बाल सिंग, आई उषा रानी शिक्षण एम ए राज्यशास्त्र, जन्म बनारस. जवळजवळ तीस वर्ष नगरसेवक दोनदा महापौर १९७७ व १९९४ तसेच १९७४ मध्ये उपमहापौर मनपा रौप्यमहोत्सवी वर्षात महापौरपद.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती जीवनगौरव २०१४, विदर्भ महिला क्रिकेट, विदर्भ महाराष्ट्र हँडबॉल, विदर्भ हॉकी, विदर्भ फुटबॉल, नागपूर फुटबॉल, संघटनेचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी. क्रीडापटूवर पुरस्कारांचा वर्षाव करणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक व मार्गदर्शक.
विद्यापीठाच्या राजकारणात प्रचंड दबदबा. बलराज अहेर यांना गुरु मानणारा. प्राचार्य हरिभाऊ केदार स्थायी समिती अध्यक्ष व अटलबहादूर महापौर पदावर असताना संपूर्ण नागपुरात राम-लक्ष्मण जोडी म्हणून लोकप्रिय.
अखेर खेळाडू थांबला…– संदीप जोशी,माजी महापौर, नागपूर
नागपूर. नागपूर शहराचे माजी महापौर सरदार अटल बहादूर यांचे आज दुःखद निधन झाले. मनापासून वेदना झाल्या. नागपूर शहरातील छोट्या मोठ्या कुठल्याही खेळाडूच्या पाठीवर विश्वासाचा हात देणारा व्यक्ती आज अखेर नियतीसमोर हरला.
मागील २० ,वर्षांपासून माझे सरदार अटल बहादूर सिंग यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. नेहमीच त्यांचे मार्गदर्शन मिळाले अनेकदा ते रागावले देखील. मात्र त्या रागावण्यात समजवण्याची भावना होती. समाजामध्ये जाऊन कशा पद्धतीने सामाजिक कार्य करायचे, खेळाडूंच्या पाठीशी कसे राहायचे याची खरी प्रेरणा सरदार अटल बहादूर सिंग यांच्याकडूनच मिळाली.
मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना सरदार अटल बहादूर सिंग अनेकदा छोटे छोटे कामे घेऊन यायचे. ती कामे बघितल्यानंतर या व्यक्तीची ओळख सर्व प्रकारच्या जाती-धर्मातील लहान मोठ्या सर्व व्यक्तीत असल्याचे जाणवायचं. कुणाच्या घरी अन्नधान्य, कुणाच्या घरी भांडी व अन्य वस्तू हव्या असल्यास सेवाभावी लोकांकडून पैसे जमा करून त्या व्यक्तींच्या शेवटपर्यंत गरजा पूर्ण करण्याची चिकाटी ही केवळ सरदार अटल बहादूर सिंग यांच्यात दिसली.
अमरावतीच्या एक प्रतिभावंत बुद्धिबळपटूचे स्वागत नागपुरात झाले पाहिजे. विदर्भात त्याला पुरस्कार मिळायला हवा, त्याला मदत मिळाली पाहिजे याकरिता सरदार अटल बहादूर सिंगजी ज्यापद्धतीने झटत होते ते बघून अनेकदा आश्चर्य वाटायचे.
क्रीडा क्षेत्रासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व जर कुणी असेल तर सरदार अटल बहादूर सिंग यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचेही नाव माझ्या डोळ्यापुढे येत नाही. केवळ हॉकी, फुटबॉल नव्हे तर कोणत्याही खेळासाठी सरदार अटल बहादूर सिंग यांच्याकडे जाणे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होणार याची शास्वती ही सर्वसामान्य व्यक्तीला असायची. त्याच धर्तीवर त्यांचे काम असायचे.
खासदार क्रीडा महोत्सवामध्ये देखील केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मार्फत सरदार अटल बहादूर सिंग यांना क्रीडा महर्षी पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी मिळालेली रक्कम त्यांनी सर्वसामान्य खेळाडूंसाठी खर्च केली होती.
मला आठवते, मी महापौर झाल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेण्याकरिता त्यांच्या घरी गेलेला होतो. त्यांच्या पायांवर प्रचंड सूज होती. चार पावलेही पुढे टाकले जात नव्हते. अशाही स्थितीत मी गेल्यानंतर माझ्यासाठी ताबडतोब काहीतरी घेऊन ये म्हणून घरच्या व्यक्तीला तातडीने रवाना केले. मला आशीर्वाद देताना त्यांनी सांगितलं, ‘संदीप तू एक विचारधारा रखनेवाली पार्टी का महापौर हैं. तू झुंजारु कार्यकर्ता हैं, पर एक बात ध्यान में रखना, महापौर सब का होता हैं. वो शहर का प्रथम नागरीक होता हैं और उसने अपनी कुर्सी का मान रखना ही चाहिये. कुर्सी का मान रखना याने शहर का मान रखना हैं. तू सभी जाती धर्म के लोगों का, सभी शहरवासीयों का महापौर हैं ये बात ध्यान में रखना. महापौर पहले हैं बाद मे किसी पार्टी का सदस्य हैं ये ध्यान में रख कर काम कर.’ अशा पद्धतीचे मार्गदर्शन करणारा व्यक्ती या जगातून निघून गेला याचे अतिव दुःख होत आहे. मी माझ्याकडून, नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे, खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.