नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरमार्फत राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबमार्फत राज्यभरातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील २० विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती या संस्थेचे पाठबळ मिळाले आहे.
महाज्योतीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या मांडल्या. विविध अडचणी व समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आपले लक्ष्य पूर्ण करण्याकरिता प्रेरीत केले. प्रत्येक अडचणीमध्ये महाज्योती विद्यार्थ्यांसोबत राहील, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या अनुषंगाने लवकरच नागपूर फ्लाईंग क्लबला भेट देण्याचे आश्वासन देखील खवले यांनी विद्यार्थ्यांना दिले.