मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) मिहानमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी बोली मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार वगळता इतर बोलीदारांना एमएडीसीकडून देण्यात आलेले बँकेचे धनादेश न वटल्याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र हे धनादेश संबंधित बँकेच्या तांत्रिक त्रुटीमुळे वटले नसल्याचे एमएडीसीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या बँकेतील खात्यात पुरेसा निधी असून बँकेच्या अधिकार्यांनी देखील याची पुष्टी केल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
या निविदा प्रक्रियेतील संबंधित बोलीदारांना दिलेले धनादेश काही तांत्रिक त्रुटीमुळे वटलेले नसावेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या शासकीय सुटीमुळे बँकेचे कामकाज बंद आहे. उद्या ( दि. २७ जानेवारी ) गुरुवारी बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर यामागील तांत्रिक कारणांबाबत उलगडा होऊ शकेल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक कपूर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई मुख्यालयातील मुख्य वित्तीय अधिका-यांना आजच म्हणजेच 26 जानेवारी 2022 रोजी तातडीने नागपूर येथील कार्यालयात जावून संबंधितांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.