भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी

– मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना

– नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई :- शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ 3) रणजित ढाकणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एच पूर्व विभाग सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात मागील काही दिवसात वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांवरील धूळ तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड पाणी फवारणी करण्याच्या त्याचप्रमाणे वॉटर फॉगर, जेटींग मशिन, सक्शन मशिन, स्मॉग गन आदींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. मुंबईत शासनाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच बांधकामाची अनेक कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काम सुरू असलेल्या इमारतींना ग्रीन कव्हर अत्यावश्यक करण्यात आले आहे. डेब्रिस उघड्या वाहनांमधून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अर्बन फॉरेस्टचे क्षेत्र वाढवून शहरावरील ग्रीन कव्हर वाढविण्यात येणार आहे. हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी शहरात 40 ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, नाले, समुद्र किनारे आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भूयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.

नागरिकांशी साधला संवाद

महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाच्या स्वच्छतेच्या कामात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या समोर आपापल्या भागातील समस्या देखील मांडल्या. खारदंडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने स्वतंत्र आणि नवीन जलवाहिनी या परिसरासाठी अंथरण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटेल, असे शिंदे यांनी आश्वस्त केले. खार भूयारी मार्ग येथे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ही समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने खार भुयारी मार्ग येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर तेथील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे त्यांनी नमूद केले. जॉगर्स पार्क येथे उद्यानातील प्रसाधनगृहांमध्ये शौचकूपांची संख्या वाढवावी, उद्यानामध्ये अधिक झाडे लावून हिरवळ वाढवावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चहापान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. शासनामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील सर्व 46 वस्त्यांमध्ये संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन

Tue Nov 21 , 2023
– महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली मुंबई :- महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना मांडली. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस असून या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com