उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :- महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी आवश्यक निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगांसाठी संगणक प्रणाली, प्लास्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण – डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. रस्ते, पाणी, वीज आणि शहराची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासन काम करत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा राज्याच्या विकासासाठी आहे.

उल्हासनगरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात शासन निर्णय लवकरच जारी होईल. उल्हासनगर शहराला 50 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे, ही पाण्याची कमतरता देखील राज्य शासन दूर करेल. मोठे रस्ते, पिण्यासाठी पाणी, वीज, गार्डन या मूलभूत सोयी सुविधा देण्याचे काम महापालिका आणि राज्य शासन दोन्हीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या शहराचा सुनियोजित विकास, मोठे रुंद रस्ते, बाग, खेळाचे मैदान, आरोग्य सुविधा, चांगल्या शाळा, दवाखाने होतील आणि यामुळे उल्हासनगरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, उल्हासनगरमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल. येथील रस्ते, घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

यावेळी आयुक्त शेख यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com