नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. पावसामुळे मोरभवन बस स्थानक परिसरात चिखल आणि पाणी साचल्याने होत असलेल्या त्रासाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार लोककर्म विभाग व हॉटमिक्स प्लाँट विभागाद्वारे मोरभवन बस स्थानक परिसरात मुरूम टाकून समतीलकरणाचे काम करण्यात सुरु आले आहे.
काही दिवसांपूर्वी सतत पाऊस पडल्यामुळे मोरभवन (विस्तारीत) बस डेपोत पाणी साचल्याने चिखल झाले व त्यामुळे डेपोच्या जागेवरुन शहर बस संचालनास व प्रवाशांकरता अडचणीचे झाले होते. तसेच डि.पी. रोडवर सुध्दा मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले होते. अशा स्थितीत आपली बस ने प्रवास करणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी देखील स्वत: भेट देऊन मोरभवन बस स्थानक परिसराची पाहणी केली व वेळोवेळी स्थितीचा आढावा देखील घेतला. संपूर्ण मोरभवन परिसरात मुरूम टाकून परिसर समतल करण्याबाबत त्यांनी विभागाला निर्देश देखील दिले होते. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार संपूर्ण परिसरात मुरूम टाकून परिसर समतल करण्यात येत आहे. मनपा आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता प्रवाश्यांना तेथून मार्गक्रमण करणे सोयीचे होत आहे.
पावसाळयात मोरभवन बस स्थानकाच्या एक्सटेंशन भागात प्रवाश्यांना कोणत्याही परिस्थितीत चिखलामध्ये जावे लागणार नाही याची पूर्ण दखल घेण्यात आली आहे. प्रवाश्यांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी व बस ऑपरेटरसाठी शेड सुध्दा उभारण्यात आले आहे. प्रवाश्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात व प्रवास सोयीस्कर असावा याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले होते या सर्व कामामध्ये मनपाचे अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय डहाके, परिवहन व्यवस्थापक गणेश राठोड व परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जातिने लक्ष दिले.