महाराष्ट्र धनुर्विद्या खेळाची भूमी बनवू या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खेळाडूंना ग्वाही

–  उपमुख्यमंत्र्यांनी ओजस देवतळे, तुषार शेवाळे, आदिती स्वामी या तिरंदाजांची घेतली भेट

नागपूर :- महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा शासन कटीबद्ध आहे. राज्याला धनुर्विद्या खेळाची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

आशिया क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे या नागपूरकर तिरंदाजाच्या घरी जाऊन त्याचे कौतुक करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आई-वडिलांशी बोलताना स्पष्ट केले होते. आज आपल्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी ओजसच्या घरी जाऊन त्याच्याशी हितगूज साधले. यावेळी आशियाड स्पर्धेत ओजस सोबत सुवर्णपदक पटकवणारा अमरावतीचा तुषार शेवाळे, साताऱ्याची आदिती स्वामी हे धनुर्विद्यापटू उपस्थित होते.याशिवाय ओजसचे क्रीडा मार्गदर्शक प्रवीण सावंतही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तीनही धनुर्विद्यापटूंना त्यांच्या आशियाळ स्पर्धेतील अनुभवाविषयी विचारले. याशिवाय राज्य शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले. ओजसने नागपूरमध्ये आणखी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. तर आदिती व तुषार शेवाळे यांनीही प्रत्येक शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

खेळाडूंच्या या अपेक्षेवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरांमध्ये मानकापूर विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा संकुल (कामठी ) नागपूर येथे दोन्ही ठिकाणी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सोयी सवलती उपलब्ध होतील. त्या पद्धतीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. राज्याच्या अन्य भागातही धनुर्विद्यापटू तयार व्हावेत. यासाठी चांगल्या सुविधा दिल्या जातील. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी धनुर्विद्या या प्रकारामध्ये चांगले यश दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनुर्विद्यापटूंसाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता करणे राज्य शासनाची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राला धनुर्विद्या क्रीडा प्रकारामध्ये अग्रेसर करण्याकडे आमचा कल आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दहापट वाढ केल्याबद्दल या तीनही खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढविण्याचे श्रेय खेळाडूंना दिले. ते म्हणाले, खरे म्हणजे तुमच्या पराक्रमाने आमचा हुरुप वाढतो. तुम्ही मेडल मिळवत राहावे, आम्ही सुविधा उपलब्ध करू. महाराष्ट्राचे नाव आपण मोठे करावे, देशाचे नाव आपण मोठे करावे.

उपमुख्यमंत्र्यांनी या भेटी दरम्यान पुन्हा एकदा त्यांनी ओजसच्या आई-वडिलांचे कौतुक केले. ओजसने नागपूरचे व महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. ओजसच्या परिवारातील अनेक सदस्यासह जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

Tue Oct 24 , 2023
– नागपूरातील दीक्षाभूमीच्या कायापालटाची ग्वाही – तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मुंबई :- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!