एकूण १२४ मतदान केंद्र आणि ३९ हजार ६०४ मतदार
30 जानेवारीला मतदान
नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी येत्या ३० जानेवारीला सहा जिल्ह्यांत १२४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नागपूर विभागात एकूण ३९ हजार ६०४ शिक्षक मतदार असून यात १६ हजार ७०२ महिला तर २२ हजार ७०४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून एकूण २२ उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
नागपूर विभागात 124 मतदान केंद्र
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान केंद्राबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून 31 डिसेंबर 2022 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात 43 मतदान केंद्र, वर्धा जिल्ह्यात 14, भंडारा जिल्ह्यात 12, गोंदिया जिल्ह्यात 10, चंद्रपूर जिल्ह्यात 27 तर गडचिरोली जिल्ह्यात 18 मतदान केंद्र आहेत.
नागपूर विभागात 39 हजार 406 मतदार
नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. २०१७ मध्ये नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या ३५ हजार ९ होती तर २०२२ अखेर ही संख्या वाढून ३९ हजार ४०६ झाली आहे. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय मतदारांची संख्या
नागपूर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची एकूण संख्या 16 हजार 480 आहे. यात 9 हजार 256 महिला तर 7 हजार 224 पुरुष मतदार आहेत. वर्धा जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 4 हजार 894 असून यात 2 हजार 962 महिला तर 1 हजार 932 पुरुष मतदारांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण 3 हजार 797 मतदार आहेत. यात 1 हजार 225 महिला तर 2 हजार 572 पुरुष मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण 3 हजार 881 मतदार असून यात 1 हजार 218 महिला तर 2 हजार 663 पुरुष मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 7 हजार 571 मतदार आहेत. यात 2 हजार 684 महिला तर 4 हजार 887 पुरुष मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 3 हजार 211 मतदार असून यात 630 महिला आणि 2 हजार 581 पुरुष मतदार आहेत.
निवडणूक कार्यक्रम व त्याची अंमलबजावणी
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी ५ जानेवारीला अधिसूचना जारी झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी होती तर १३ जानेवारीला अर्जांची छाननी करण्यात आली. २७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते यापैकी पाच उमेदवारांनी १६ जानेवारी रोजी अर्ज मागे घेतले.
भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ३० जानेवारी २०२३ रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.४ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया संपणार आहे.