संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात अवैध सावकाराचे जाळे पसरले असून काही जण अवैध सावकारी बळ करत व्याजाने पैसे देत असल्याचे ऐकिवात येते तेव्हा संबंधित जागरूक नागरिक वा पीडिताने सहाय्यक निबंधक विभाग कामठी कडे पुराव्यानिशी लेखी तक्रार केल्यास बेकायदेशीर व्याजाने पैसे देणाऱ्यावर तसेच सावकारी करणाऱ्या दलालावर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा कामठी येथील सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
बहुतांश शहरी व ग्रामीण भागात बोकाळलेल्या बेकायदेशीर व्याजबटी सावकारी करणाऱ्या दलालांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाच्या वतीने सहाय्यक निबंधक विभागाने कंबर कसली असून या दलालावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाचा महाराष्ट्र सावकारी अध्यादेश 2014 सुधारित कायद्यांतर्गत कामठी तालुक्यात कारवाई करण्यात येईल.सदरील कायद्याच्या अनुषंगाने व्याजाने पैसे देत सावकारांनी शेतकरी ,व्यापारी ,लघु उद्योजक ,शेतमजूर यासह समाजातील विविध घटकाकडून मोठ्या प्रमाणात अवास्तव दराने व्याज वसूल करणे ,मालमत्ता हडप करणे,दमदाटी करणे,उपद्रव,गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमकी ,मारहाण आदी गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.अश्या प्रकारचा त्रास कोणी सावकार,दलाल मंडळी देत असतील तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी यांनी केले आहे.याशिवाय ज्यांना कर्ज पाहिजे असेल विशेषतः शेतकऱ्यानी राष्ट्रीयकृत बँका,सहकारी संस्था, परवाना धारक सावकार यांच्याकडूनच व्याज दर निश्चित घेऊनच कर्ज मागणी करावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.