अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने ‘कन्झव्र्हींग दी स्लोथ बियर ऑफ इंडिया थ्रू कम्युनिटी आऊटरिच अॅन्ड एज्युकेशन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. एच.पी. नांदुरकर, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडतकर, व्याख्याते हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण येथील जीवन विज्ञान विभागप्रमुख डॉ. निशिथ धारैया, त्यांचे संशोधक विद्यार्थीनी शालू मेसारिया, निशा प्रजापती, सार्थक चौधरी, मयुर जुडाल, प्रतिक देसाई आदींची उपस्थिती होती.
डॉ. निशिथ धारैया यांनी अस्वल या वन्य प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनाबाबत माहिती दिली. अस्वलाच्या जगभरातील प्रजाती, वास्तव्य, प्रजननाविषयी मार्गदर्शन केले. शालू मेसरिया हिने वन्य प्राणी आणि मानवाचे सहजीवन कशाप्रकारे शक्य होईल, यावर प्रकाश टाकला. उपस्थितांच्या शंकांचे व्याख्यातांनी निरसन केले. डॉ. एच.पी. नांदुरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वाती वडुरकर हिने पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन रचना धुरे, तर आभार गायत्री तळेकर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विभागातील कर्मचारी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.