यवतमाळ :- नेहरु युवा केंद्र, मेरा युवा भारत युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्यावतीने इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत श्री दत्त हॉस्पीटल अँन्ड रिसर्च सेंटर यवतमाळ येथे दि. 19 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आरोग्य विषयक इंटर्नशिप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाकरीता माय भारत पोर्टलवर इच्छुक युवकांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी पाच युवकांची निवड करुन श्री दत्त हॉस्पीटल अँन्ड रिसर्च सेंटर येथे इंटर्नशिप कार्यक्रम तीस दिवस चालणार आहे. याद्वारे युवकांना आरोग्य क्षेत्रामध्ये कशा प्रकारे कार्य केली जातात, रुग्णांना कोणत्या प्रकारे सेवा दिली जाते, त्याचप्रमाणे शासकीय योजनेद्वारे कशा प्रकारे उपचार केले जातात याचे मार्गदर्शन केल्या जाणार आहे.
इंटर्नशिप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री दत्त हॉस्पीटल अँन्ड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर देशपांडे यांनी युवकांना हॉस्पीटलबाबत प्राथमिक माहिती दिली. सदर कार्यक्रम हा तीस दिवस चालणार असून यात युवकांना हॉस्पीटलद्वारे चालविण्यात येणारे उपक्रम व आरोग्य सेवा तसेच शासकीय योजनेद्वारे रुग्णांना दिली जाणारी सेवा याबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी हॉस्पीटलचे डॉ.सतीश चिरडे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज चव्हाण, पवन आडे, बाळू पवार, वैष्णवी जाधव, जय शिंदे हे विद्यार्थी तीस दिवस दररोज हॉस्पीटल मध्ये जावून प्रशिक्षण घेणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम व अनिल ढेंगे यांनी प्रयत्न करून युवकांना, प्रशिक्षणात सहभागी होण्याकरीता प्रोत्साहित केले.