खापरी-चिंचभवनचा परिसर स्मार्ट सिटीप्रमाणे विकसित होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– चिंचभवन आरओबी ते जामठा दरम्यान नवीन उड्डाणपुलाचे भूमिपूजन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नागपूर :- मिहान, आयआयएम, लॉ स्कूल, ट्रिपल आयटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ अश्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडला गेलेला खापरी आणि चिंचभवनचा परिसर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या चिंचभवन आरओबी ते जामठा यादरम्यान २.६९ किलोमीटरच्या सहापदरी उड्डाणपुलासह रस्त्याचे सहापदरीकरण होणार आहे. या कामाचे आज ना. नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आरओबीसह रस्त्याची एकूण लांबी ५.७४ किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत ६२० कोटी एवढी आहे. या कामाला रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली असून लवकर कामाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार नाना श्यामकुळे, अविनाश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला.

ना. गडकरी म्हणाले, ‘मी बांधकाम मंत्री असताना दोनपदरी पूल बांधला होता. त्यानंतर रहदारी वाढल्यामुळे त्याला जोडून आणखी एक पूल बांधला. आज सहापदरी पुलाचे भूमिपूजन होत आहे. हा पूल झाल्यानंतर बाहेरून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरमध्ये प्रवेश करता येणार आहे. वाढत्या नागपूरमध्ये नवीन कनेक्टिव्हिटी अत्यंत आवश्यक होती.’ मिहान व परिसरात काम करणाऱ्या लोकांना खापरी व चिंचभवनमधील वसाहतींमध्ये वास्तव्य करण्याचा उत्तम पर्याय आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत हा भाग स्मार्ट सिटी म्हणून विकसित करता येईल, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.

वाहतूक कोंडी सुटेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘चंद्रपूर, वर्धा आणि समृद्धी महामार्गाच्या दिशेने जाणारी वाहतूक खूप मोठी आहे. या मार्गावर बरेचदा वाहतूक कोंडी होते. मात्र नवीन पूल झाल्यानंतर हा प्रश्न सुटेल. अतिशय योग्यवेळी हा पूल तयार होत आहे. एकुणात नागपूरची व आसपासच्या परिसरातील वाहतुकीचे सुरळीत संचालन होईल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भट सभागृहामधील चेंगरा चेंगरीला जबाबदार आयोजक व प्रमुख नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करा

Fri Mar 15 , 2024
– सीटू तर्फे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिले निवेदन नागपूर :- भट सभागृह नागपूर येथे ९ मार्च रोजी घरगुती भांडी वाटप कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप तर्फे आयोजित करण्यात आला होता. मोफत भांडी वाटप कार्यक्रम ८ मार्च जागतिक महिला दिनापासून ११ मार्च पर्यंत असा चार दिवसाचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ या नावाखाली इमारत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com