नागपूर :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी व या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवावी, शासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मंगळवारी (ता:२३) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त तथा सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, नरेंद्र बावनकर, घनशाम पंधरे. गणेश राठोड, हरीश राऊत, प्रमोद वानखेडे, अशोक घरोटे, विजय थूल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, बालविकास प्रकल्प अधिकारी सर्वश्री. दामोधर कुंभरे, नितीन मोहुर्ले, श्रीमती भारती मानकर, अपर्णा कोल्हे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, नूतन मोरे, अंगणवाडी पर्यवेक्षक(शहर) मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मनपाच्या दहाही झोन निहाय आणि प्रभाग निहाय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशित केले. सर्व सहायक आयुक्तांनी मनपाच्या दहाही झोन केंद्र, प्रभाग निहाय केंद्रांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे, सर्व केंद्रावर ऑफलाईन प्राप्त होत असलेल्या अर्जांना ऑनलाईन करण्यासाठी लागणारे पुरेसे व अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे, प्राप्त अर्जाची योग्य छाननी करण्यासाठी छाननी समिती, मान्यता समिती स्थापन करून शासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अपात्र अर्जांच्या हरकती मागविण्यासाठी ३ दिवसांकरिता यादी झोन स्तरावर ऑनलाईन स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी, योजनेचा व्यापक प्रचार – प्रसार व प्रत्यक्ष लाभ याविषयीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरण्यासाठी प्रासंगिक आशा सेविकांची मदत घावी असे देखील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सूचित केले.