– भंडारा पंचायत समिती विभागात प्रथम तर राज्यात तिसरी
– पुरस्कार विजेत्यांचा ५फेब्रुवारीला विभागीय आयुक्तांकडून होणार सन्मान
नागपूर :- प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी काटोल पंचायत समितीला राज्य शासनाच्या वर्ष २०२२-२३च्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत विभागातून पहिल्या क्रमांकाचा तर राज्यातून दुसऱ्या कम्रांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांतर्गत वर्ष २०२०-२१ साठी विभागस्तरातून भंडारा पंचायत समिती पहिल्या तर राज्यात तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. या उभय पंचायत समित्यांसह अन्य पुरस्कार विजेत्यांना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते येत्या ५ फेब्रुवारी रोजी गौरविण्यात येणार आहे.
यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत नागपूर विभागातील एकूण ६३ पंचायत समित्यांसाठी वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२२-२३ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण बिदरी यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वंसतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
वर्ष २०२२-२३च्या राज्यस्तरीय पुरस्कारात नागपूर जिल्ह्यातील काटोल पंचाय समितीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून १७ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष २०२२-२३च्या विभाग स्तरावरील पुरस्कारात काटोल पंचायत समितीला पहिल्या क्रमांकाचा तर कामठी पंचायत समितीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे स्वरुप अनुक्रमे ११ लाख आणि ८ लाख रुपये असे आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार चंद्रपूर पंचायत समिती आणि गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समितीला संयुक्तपणे जाहीर झाला असून या पंचायत समित्यांना पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी ३ लाख रुपये प्रदान करण्यात येणार आहेत.
वर्ष २०२०-२१च्या पुरस्कारात भंडारा पंचायत समिती विभागातून प्रथम आली असून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुरस्कार स्वरूपात क्रमश: ११ लाख आणि १५ लाख रुपये या पंचायत समितीला प्रदान करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोर्भुणा पंचायत समिती विभागातून दुसऱ्या तर नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समिती तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या पंचायत समित्यांना पारितोषिक स्वरुपात अनुक्रमे ८ लाख व ६ लाख रूपये प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत वर्ष 2005-06 पासून स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने विभागस्तर व राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हापरिषदा, पचंयात समित्या आणि गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते.