– लाखो लाडक्या बहिणींनी अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा – आमदार देवेंद्र भुयार
मोर्शी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी मोर्शी विधानसभा समितीचे अध्यक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच ऑन लाईन पडताळणीमध्ये समितीच्या बैठकीत मोर्शी विधानसभा मतदार संघातील मोर्शी तालुक्यातील २७ हजार ९३२ अर्ज मंजूर करण्यात आले असून वरूड तालुक्यातील २९ हजार ७९९ अर्ज मंजूर करण्यात आले. मोर्शी वरूड तालुक्यातून ५७ हजार ७३१ अर्ज मंजूर करण्यात आले असून मोर्शी वरूड तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ६३ हजार ८०६ महिलांनी अर्ज केले आहेत.
आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघामध्ये तालुका स्तरावर शिबीरे घेऊन पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. मोर्शी वरूड तालुक्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी मोर्शी वरूड तालुक्यात छाननी कक्ष स्थापन केलेला आहे. तिन शिफ्ट मध्ये निर्धारित निकषानुसार अर्ज छाननी,अंतिम करण्याच्या कार्यपध्दतीनुसार काम सुरु आहे. उर्वरीत ऑनलाईन प्राप्त अर्जावर कार्यवाही सुरु असून नव्याने प्राप्त होणारे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याचे काम गावपातळीवर सुरु असुन पात्र लाभार्थी यांना लाभ मंजूरी करण्याबाबतही कार्यवाही सुरु असून मोर्शी वरूड तालुक्यातील लाखो बहिणींनी अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी. https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे. या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले आहे.