– नागपूरकर झाले लोटपोट
– खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आठवा दिवस
नागपूर – अख्ख्या महाराष्ट्राला कोरोनासारख्या कठीण काळातही आपल्या विनोदांनी हसवणारे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके हास्य कलाकार समीर चौगुले, अरुण कदम, विशाखा सुभेदार यांच्या हास्यविनोदांच्या चौकारांनी नागपूरकर रसिक लोटपोट झाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या पटांगणावर लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ सादर करण्यात आला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक व सई परांजपे आणि सूत्रसंचालन करणा-या प्राजक्ता माळी यांनी खास व-हाडी रसिकांची संवाद साधून नागपूरकरांना खूश केले. विदर्भाच्या मातीत जन्मलेले श्रीकांत जिचकार, महेश एलकुंचवार, पुरुषोत्तम दारव्हेकर, वसंतराव देशपांडे, शहिद हेमंत करकरे असे अनेक कर्तृत्ववान शिलेदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची सून ताराराणीदेखील विदर्भाची आहे, असे सांगत असतानाच हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळणारी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मंचावर अवतरली. ‘स्त्री म्हणजे चुलीचा कारभार नव्हे, ती पेटली तर दिल्लीचा कारभार उद्धवस्त करू शकते’ असे म्हणत ताराराणीने ‘हर हर महादेव’ चा गजर केला. तिच्या सुरात रसिकांनीही सूर मिसळला. नंतरचे तीन तास समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात आणि चमूने नागपूरकरांना पेाट धरून हसवले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रसिद्ध होमियोपॅथ डॉ. विलास डांगरे, प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, उपायुक्त पखाले, कांचन गडकरी, लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, सकाळचे निवासी संपादक संदीप भारंबे, हॉटेल अशोकचे सीएमडी संजय गुप्ता, दिपेन अग्रवाल, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, रेणुका देशकर यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभत आहे. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले.
गर्दी नाय प्रेम हाय
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांना बघण्यासाठी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती. ही ‘गर्दी नाय, नागपूरकरांचे प्रेम हाय’, असे खास व-हाडी शैलीत प्राजक्ता म्हणत तर्री पोह्यासारख्या झणझणीत आणि संत्रा बर्फीसारख्या गोड नागपुराकरांना अभिवादन केले. थेट पण मनाने निर्मळ, न बोचणारा सुरात रांगडेपणा, महाराष्ट्रात कार्य व जगभरात हवा करणा-या लोकांचे शहर असलेले नागपुरात आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटते, असे सई म्हणाली.
नागपूरकर कलाकरांची सुरीली मैफल
इंडियन आयडॉल मराठी या रिअॅलिटी शोमध्ये सध्या गाजत असलेले नागपूरचे गायक कैवल्य केजकर, जगदीश चव्हाण, भाग्यश्री टिकले यांनी कार्यक्रमात विविध गीते सादर करीत सुरीली मैफल सजवली. सुरुवातीला कैवल्यने ‘देवा श्री गणेशा’ हे गीत सादर करून हास्यजत्रेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर जगदीशने ‘गोंधळ मांडीला’ व भाग्यश्रीने ‘आताच बया का बावरलं’ हे गीत सादर केले.
महोत्सवात
चारदा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक पद्म श्रीशंकर महादेवन यांचा ‘ माय इंडिया… माय म्युझिक’ हा कार्यक्रम.