राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न जयंत पाटील यांनी सोडून द्यावे – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

सातारा :- राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितले.

ते सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करत असून पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टिप्पणीविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरील प्रतिपादन केले. उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे, असे विचारले असता त्यांनी ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे, असे उत्तर दिले.एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी, असाही टोला बावनकुळे यांनी हाणला.

ते म्हणाले की, प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे म्हणून विश्व हिंदू परिषद, शिवप्रतापगड उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. मतांच्या राजकारणासाठी आणि लांगुलचालनामुळे उद्धव ठाकरे सरकारला हे अतिक्रमण काढण्याची हिंमत झाली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिक्रमण हटविले याबद्दल आपण सरकारचे अभिनंदन करतो.

प्रतापगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण सरकारला विनंती करू, असेही ते म्हणाले.

सातारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युती असेल व युतीचाच नगराध्यक्ष होईल. भाजपाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढतील व विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंडईच्या गर्दीत होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची नजर

Fri Nov 11 , 2022
भंडारा :- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मंडई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मंडई निमित्ताने जमा होणान्या गर्दीच्या फायदा घेत काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांचे बालविवाह पार पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. विवाह करिता वधूचे वय 18 वर्षे तर वराचे वय 21 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. तरीही लग्ना करिता निर्धारित असलेले वय पूर्ण न करताच पालक आपल्या मुलांची लग्न मंडईच्या गर्दीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com