नागपूर दि. २८ डिसेंबर :- दुर्गम भागात वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यांच्या आरोग्य यंत्रणेची अवस्था दयनीय झाल्याचे समोर येत आहे. नर्मदा नदी काठावरील ३३ पाड्यांसाठी तरंगत्या दवाखान्याची सोय आहे. मात्र त्याचे वास्तव भयाण आहे असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आणि आवश्यक कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स मात्र कमी आहेत. या दवाखान्यात वीज नाही. त्यामुळे रात्री बॅटरीच्या प्रकाशात रुग्णांना तपासावे लागते. औषध पुरवठ्यासाठी किमान आठवडाभर तरी वाट पहावी लागते हेही जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या बांधवांना मूलभूत सुविधा देण्यासाठी, राज्यभरातील सर्वत्र आरोग्यसंस्थांना सुदृढ करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. कोरोना पुन्हा डोकं वर काढतो आहे. अशा परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून, प्राथमिकता ओळखावी अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली आहे.