– समता रॅली, ढोल ताशा पथकाने दिली मानवंदना
– सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीचा विक्रमी लाभ
– भावपुर्ण शाहीरी जलशा अनुयायी पानावले
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी दीक्षाभूमी येथे अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेतली. हा परिवर्तनाचा दिवस दरवर्षी धम्मदीक्षा दीन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देश विदेशातून बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमी येथे भेट देण्यास येतात बुध्द आणि धम्माच्या विचारांनी प्रेरीत होऊन पुढच्या धम्मदीक्षादीनाची वाट पाहतात. अश्या या मंगलमय सोहळ्याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा असवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतीक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात बार्टीच्या जेईई तसेच नीटच्या विद्यार्थ्यांची समता रॅली, बाबासाहेबांना मानवंदना देणारे ढोल ताशा पथक, शाहीरी जलशा आणि दीक्षाभूमी येथे 85 टक्के सवलतीच्या दरातील पुस्तक विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याच्या उद्घाटन सत्राची सुरवात दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी सामाजिक न्याय भवनातील नियोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सा. आयुक्त सुकेशनी तेलगोटे, बार्टी विभाग प्रमुख वृषाली शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबेळी, सा. प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे, अनिल वाळके उपस्थित होते. त्यानंतर भीमवादळ या ढोल ताशा पथकाने बाबासाहेबांना मानवंदना दिली. यावेळी ढोल ताशासह दीक्षाभूमी पर्यंत बार्टीच्या जीईई नीटच्या विद्यार्थ्यींची समता रॅली काढण्यात आली. यास उपस्थित धम्मबांधवांचा उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषाच्या सामाजिक समता प्रस्थापित करणारे पुस्तके, डॉ. बाबासाहेब यांचे खंड, भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र, भिवा ते बोधिसत्व आदी महत्वपूर्ण पुस्तके 85 टक्के सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आले होते. यावेळी बार्टीच्या योजनेचे माहितीपत्रक आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाटपही करण्यात आले. यास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, बौध्द भिखू, समता सैनीक दलाचे कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनी भेट देऊन सवलतीचा लाभ घेतला.
संध्याकाळी सामाजिक न्याय भवन परिसरात विकास राजा यांच्या आंबेडकरी शाहिरी जलशाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संविधानाच्या मुलभूत अधिकार कलम यावर आधारित शाहिरींने उपस्थित बौद्ध बांधवांचे लक्ष वेधले. फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा यांच्या क्रांतीकारी गीतांनी वातावरण भारावून टाकले. सदर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी बार्टीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच समतादूत यांचे विशेष सहकार्य लाभले.