सी ॲन्ड डी वेस्ट मटेरियल व्यवस्थापनासंदर्भात दिशानिर्देश जारी, मनपाद्वारे टोल फ्री क्रमांक जारी : दंडाची देखील तरतूद

नागपूर :- सी ॲन्ड डी वेस्ट म्हणजेच बांधकाम व पाडकाम वेस्ट मटेरियल व्यवस्थापन नियमावली २०१६ संदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशाची दहाही झोनमध्ये अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशामध्ये सी अँड डी कच-याकरिता टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलेला आहे. हा कचरा भांडेवाडी येथे प्रक्रियास्थळी न पोहोचविता इतरत्र कुठेही टाकल्यास दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेद्वारे कचरा विलगीकरण, पुनर्वापर, पुनर्निर्मिती वर भर दिला जात आहे. मनपा क्षेत्रातील सी ॲन्ड डी वेस्ट निर्माते शासकीय, निमशासकीय, व्यावसायिक, रहिवासी, बांधकाम स्थळे आदींकरिता दिशानिर्देश लागू राहतील. यामध्ये सी ॲन्ड डी वेस्ट निर्माते (C&D Waste- Generator) आणि मोठ्या प्रमाणात सी ॲन्ड डी वेस्ट निर्माते (Bulk Waste Generator) म्हणजेच २० टन किंवा अधिक प्रतिदिन किंवा ३०० टन आणि अधिक प्रतिप्रकल्प एक महिन्यामध्ये असे विभाजीत करण्यात आले आहे.

मनपा आयुक्तांद्वारे दिशानिर्देशानुसार, शहरातून निर्माण होणारा सर्व प्रकारचा सी ॲन्ड डी वेस्ट प्रक्रियेसाठी भांडेवाडी येथे पाठविण्यात येईल. सी ॲन्ड डी वेस्ट कचरा निर्माती व्यक्ती स्वतः ते भांडेवाडी येथे जमा करू शकते किंवा मनपाद्वारे तो प्रक्रियास्थळी पोहोचविला जाऊ शकतो. सी ॲन्ड डी वेस्ट व्यवस्थापनाकरिता मनपाद्वारे ठराविक शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. सी ॲन्ड डी वेस्ट निर्माते यांनी टोल फ्री क्रमांक 18001233595 वर फोन करून मनपाच्या सेवेचा लाभ घेता येईल. मनपाद्वारे सी ॲन्ड डी वेस्ट संकलन करून तो प्रक्रियास्थळी पोहोचविण्यासाठी प्रति मेट्रीक टन करिता रुपये ३४४/- अधिक जीएसटी एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तसेच रुपये २३४/- प्रति मेट्रिक टन अधिक जीएसटी सी ॲन्ड डी वेस्ट प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्याकरिता अतिरिक्त शुल्क आकारल्या जाईल. दरवर्षी या शुल्कामध्ये ५ टक्के वाढ केली जाईल. मनपातर्फे भांडेवाडी येथील निर्धारित जागेवर सी ॲन्ड डी वेस्ट प्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता मनपा व मे. हैद्राबाद सी ॲन्ड डी वेस्ट प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, कंपनीद्वारे सी ॲन्ड डी वेस्ट रिसायकल करण्यात येणार आहे. रिसायकलिंगद्वारे पुर्नप्रप्ती झालेले मटेरियल खाजगी, शासकीय, निमशासकीय संस्थांना/व्यक्तींना कंपनीद्वारे संयुक्तिक दरावर विक्री केली जाणार आहे.

अनधिकृतरित्या सी ॲन्ड डी वेस्ट टाकणाऱ्यांना रु. ५५००/- दंड

मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार सी ॲन्ड डी वेस्ट भांडेवाडी येथे प्रक्रियेसाठी न देता इतरत्र कुठेही टाकल्यास त्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. इतरत्र कुठेही बांधकाम मटेरियल आणि बांधकाम व पाडकाम वेस्ट मटेरियल (सी ॲन्ड डी वेस्ट ) व तत्सम कचरा टाकल्यास मनपाद्वारे रुपये ५५००/- प्रति वाहन (मटेरियलचे प्रमाण कमी असले तरीही) दंड आकारण्यात येईल. या दंडाच्या रक्कमेमध्ये प्रतिवर्षी रुपये ५००/- वाढ केली जाणार असल्याचेही मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशात स्पष्ट केले आहे.

सी ॲन्ड डी वेस्टचे पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण

प्रत्येक सी ॲन्ड डी वेस्ट निर्मात्याला कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण व साठा करावयाचा आहे. सी ॲन्ड डी वेस्टचे वर्गीकरण काँक्रीड, विटा व मॉर्टर, माती, लोखंड आणि लाकूड व प्लास्टिक या पाच प्रकारे करावयाचे आहे. तद् नंतर स्वखर्चाने भांडेवाडी येथे पोहोचता करावयाचा आहे.

बांधकाम श्रेणीमध्ये इमारती, रस्ते, पूल, विहिर, गडर लाईन, सेप्टिक टँक, दूरसंचार लाईन/टॉवर, विद्युत खांब, ड्रेन आदीं सुविधांच्या निर्मिती करण्यात येणारे बांधकाम.

इमारती, रस्ते, पूल, विहिर, गडर लाईन, सेप्टिक टँक, दूरसंचार लाईन/टॉवर, विद्युत खांब, ड्रेन आदीं सुविधांच्या निर्मितीसाठी करण्यात येणारी तोडफोड याचा समावेश डिमॉलिशन श्रेणीमध्ये होतो.

उपरोक्त दोन्ही श्रेणीमधील बाबी या कन्स्ट्रक्शन अँड डेमॉलिशन श्रेणीमध्ये येतात. भारतीय रेल्वे, विमानतळ, डिफेन्स, महामेट्रो, नासुप्र, म्हाडा आदी खाजगी, शासकीय, निमशासकीय संस्था, रहिवासी आणि व्यावसायिक आस्थापनांमधून निर्माण होणारा प्रमाणातील बांधकाम आणि मलबा स्वरूपातील कचरा. तसेच २० टन किंवा अधिक प्रतिदिन किंवा ३०० टन आणि अधिक प्रतिप्रकल्प एक महिन्यामध्ये सी ॲन्ड डी वेस्ट निर्माण करणा-या संस्था, रहिवासी स्थळे, व्यक्तींचा समावेश बल्क वेस्ट जनरेटर (Bulk Waste Generator) मध्ये करण्यात आला आहे.

भौतिक, रासायनिक, प्रक्रियाशील, विषारी, ज्वलनशील, स्फोटक किंवा संक्षारक वैशिष्ट्यांमुळे धोका निर्माण करणारा आरोग्य किंवा पर्यावरणाला धोका निर्माण करणारा कचरा घातक कच-यामध्ये अंतर्भूत केला जातो. हा कचरा सी ॲन्ड डी वेस्ट मध्ये टाकण्यात येऊ नये, हा कचरा वेगळा जमा करण्यात यावा. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण बी यांनी वरील प्रमाणे दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी जी. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले हजयात्रेकरूंचे स्वागत

Thu Jun 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मुस्लिम धर्मातील मक्का मदीना तीर्थक्षेत्र असून ज्यांचे कडे कुणाचे कर्ज नाही,निष्कलंक आहे ,ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा नागरिकांनी जीवनात एक वेळ तरी हजयात्रा करावी अशी संकल्पना आहे त्यानुसार कामठी तालुक्यातील बहुतांश मुस्लिम समाजबांधव हजयात्रेला जात असून त्या ठिकाणी एक महिना सर्व मुस्लिम समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी नमाज पठण वगैरे धार्मिक विधी करीत असतात.अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com