बाजारगांव कंपनीतील स्फोट प्रकरणी चौकशी सुरू – मंत्री डॉ. सुरेश खाडे

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील चाकडोह, बाजारगाव येथील संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रे उत्पादन करणाऱ्या सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड या कारखान्यात स्फोट होऊन ९ कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित सर्व विभागांमार्फत चौकशी सुरु असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रवीण दटके, सचिन अहिर, शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केली होती. त्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते.

नागपूर येथील अमरावती रोडवर असलेल्या चाकडोह बाजारगाव येथील सोलार इंडस्ट्रिज इंडिया लि. या कारखान्यात १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या स्फोटाच्या घटनेतील मृत कामगारांपैकी ८ कामगार हे कामगार राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना कामगार राज्य विमा योजना कार्यालयाकडून नियमानुसार निवृत्तीवेतन मिळणार आहे. तर उर्वरित १ मृत कामगाराच्या वारसाला नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबत व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी रु. २० लाख सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. ५ लाख देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. पी.एम.केअर फंडातून आर्थिक मदत मिळण्याबाबत नागपूर जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ९ मृत कामगारांच्या एका वारसदारास कंपनीमार्फत नोकरी देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. कारखाना व्यवस्थापनाने मृत कामगार मिता ऊईके आणि ओमेश्वर मच्चीरके यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

सोलार इंडस्ट्रिज इंडिया लि. या कारखान्यात संरक्षण विभागाकरीता लागणाऱ्या विस्फोटकांचे उत्पादन केले जाते. कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे ३४०० असून कारखान्यातील कामगारांना किमान वेतन देण्यात येत आहे. कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ या इमारतीत टी.एन.टी. आणि आर. डी. एक्स. या कच्च्या मालाचा वापर करुन हॅण्ड ग्रेनेड बनविण्यासाठी लागणाऱ्या पेलेटसची निर्मिती केली जाते.

17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर 2 मध्ये नेहमी प्रमाणे काम सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी टी.एन.टी. फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत (Sieving) असतांना सकाळी 9.00 वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याने कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण 9 कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला व 3 पुरुष कामगारांचा समावेश आहे.

घटनास्थळास नागपूर जिल्हाधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक, अपर संचालक व वरिष्ठ अधिकारी, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा विभागाचे अधिकारी, बॉम्ब शोध व निकामी पथक, दहशतवाद विरोधी पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ, पोलीस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील चौकशी सुरु आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल उपस्थित असून कार्यवाही सुरू आहे, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाचा अहवाल प्राप्त - मंत्री उदय सामंत

Thu Dec 21 , 2023
नागपूर :- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या आयुक्त, आरोग्य सेवा मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अनिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com