Ø पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
Ø मेळाव्यास नामांकीत कंपन्यांची उपस्थिती
यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात 425 रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या तर 54 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यापीठ गीताने झाली. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयंत चतुर, उद्घाटक म्हणून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी जी. यु. राजुरकर तसेच उमेदवारांना मार्गदर्शक म्हणून गणेश सव्वालाखे हे उपस्थित होते.
या मेळाव्यास इसाफ स्मॉल फायनान्स बँक नागपूर, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यवतमाळ, रतन असोसिएट अमरावती, मॅक व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड, राजवी होंडा यवतमाळ, चैतन्य फायनान्स वाशीम, उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँक नागपूर इत्यादी नामांकित कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण 424 रिक्त पदांकरिता मुलाखती घेण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमाचे संचलन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले. सदर रोजगार मेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील एकूण 288 उमेदवारांनी घेतला. त्यापैकी एकूण 54 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यामध्ये स्वयंरोजगाराच्या दृष्टीने उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, संत रोहिदास चर्मकार उद्योग महामंडळ तसेच इतर मागासवर्गीय विकास महामंडळाचे समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते. समन्वयक, प्रतिनिधींनी उपस्थित उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.