– गांधीनगर स्केटिंग रिंक, क्रेझी केसल येथील नदी पात्राचा घेतला आढावा
नागपूर :- नागपूर शहरातील नाग नदीसह पिवळी आणि पोहरा या नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी गुरूवारी (ता.२) नाग नदीच्या स्वच्छता कार्याची पाहणी केली. त्यांनी अंबाझरी टी-पॉईंट ते क्रेझी केसल ते अंबाझरी दहन घाट, डागा ले-आऊट कॉर्पोरेशन कॉलनी येथील स्केटिंग रिंक येथील नदीच्या पात्रासंदर्भातील कामांचा यावेळी आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणी दौ-याप्रसंगी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी, उपअभियंता मोकाडे, मनोहर राठोड आदी उपस्थित होते.
सप्टेंबर महिन्यात उद्भवलेली पूरसदृश्य परिस्थिती पुन्हा उद्भवू नये व अंबाझरी ओव्हर फ्लोवरील पाणी सहज वाहून जावे यासाठी अंबाझरी टी-पॉईंट ते क्रेझी केसल ते अंबाझरी दहन घाट दरम्यानचे नाग नदीचे पात्र १७ मीटर रुंद करण्यात येत आहे. सिंचन विभागाच्या सूचनेनुसार मनपाद्वारे हे कार्य सुरू असून अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी या कार्याची पाहणी केली. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व त्याला कुठलाही अडथळा निर्माण होउ नये यासाठी स्वामी विवेकानंद स्मारक समोरील रस्त्यावरच्या पुलाचे पुनर्निर्माण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.
तसेच क्रेझी केसलमधील नाग नदीच्या अरुंद पात्राचे रुंदीकरण महामेट्रो कडून करण्यात येणार आहे. याशिवाय अंबाझरी दहन घाटामधील नदीचे पात्र रुंद करण्याचे कार्य जिल्हा नियोजन आणि विकास परिषद (डीपीडीसी) च्या निधीतून करण्यात येणार आहे. या तिनही कामांच्या संदर्भातील माहिती यावेळी श्रीमती गोयल यांना देण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यासद्वारे डागा ले-आऊट येथील स्केटिंग रिंकचे नदीच्या पात्रावर बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यासद्वारे तोडण्यात आले असून मलबा हटविण्यात येत आहे. या ठिकाणी भेट देउन येथील कामाचा अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घेतला.
नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यांची सफाई जोरात सुरु आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. नाग नदीची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक, अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल, सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाणपूल आणि पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम) अशा टप्प्यांमध्ये स्वच्छता केली जात आहे.
पिवळी नदीची गोरेवाडा तलाव ते नारा घाट, नारा घाट ते वांजरा एसटीपी आणि वांजरा एसटीपी ते नदी संगम पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता सुरू आहे. पोहरा नदीचे सहकार नगर ते बेलतरोडी पूल दरम्यानच्या स्वच्छतेचे कार्य सुरू आहे. नदी स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी व उर्वरित नदीच्या लांबीची सफाई करण्यासाठी अतिरिक्त ८ पोकलेन लावण्यात आले असून १५ जून २०२४ पूर्वी शहरातील तिनही नद्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
नागपूर शहरातील नद्यांची सखोल स्वच्छता व्हावी यादृष्टीने ६ चमू तयार करण्यात आलेल्या असून, प्रत्येक चमूमध्ये मशीनचा समावेश आहे. मनपाचे तसेच भाडेतत्वारील पोकलेन, टिप्पर याद्वारे नद्यांची सफाई केली जात आहे. अतिरिक्त पाऊस आल्यासही पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता नद्यांची अधिकाधिक पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे.