– मनपाचे ‘मी पण डिजिटल 4.0’ अभियान
नागपूर : शहरातील विविध बाजारपेठांमध्ये पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहाराबद्दल माहिती मिळावी याकरिता पथनाट्याद्वारे डिजिटल ऑनबोर्डिंग जनजागृती केली जात आहे. पथविक्रेत्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग आणि प्रशिक्षणासाठी मनपाच्या समाज विकास विभागातर्फे दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ” मी पण डिजिटल 4.0′ मोहीम राबविल्या जात आहे. मोहिमेची सुरुवात नागपूर महानारपालिकेच्या मुख्य इमारतीपासून झाली. यावेळी निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवली.
केंद्र सरकारने पथविक्रेत्यांना डिजिटल पेमेंटद्वारे पेमेंट करण्यासाठी आणि प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी ‘मी पण डिजिटल ४.0’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत शहरातील पथविक्रेत्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना डिजिटल ऑनबोर्डिंग आणि प्रशिक्षण दिल्या जात आहे.
मंगळवारी (ता. १४) रोजी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.यात विद्यार्थी प्रणव जमुडे यांच्या नेतृत्वात खामला बाजार, सोमलवाडा, जयताळा बाजार येथे. तर विद्यार्थी प्राची सिरसाट यांच्या नेतृत्वात गोकुलपेठ बाजार, फुटाळा तलाव, फुले मार्केट बर्डी मार्केट येथे पथनाट्य सादर करण्यात आले. ही मोहीम येत्या १६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.