– केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि पोलीस अधिक्षक धाराशिव यांचा विशेष उपक्रम
धाराशिव :- 1 जुलै 2024 पासून नवे भारतीय फौजदारी कायद्याचे एक नवे व सुधारित पर्व सुरु झाले आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता, 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023, भारतीय साक्ष्य अधिनियम, 2023 या कायद्यांचा समावेश आहे. सदर कायद्यांच्या तपशिलाविषयी जनसामान्य नागरिक, पोलीस विभाग, वकील आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, सोलापूर आणि पोलीस प्रशासन यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक 23 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता नवीन पोलीस अधिक्षक कार्यालय, धाराशिव येथे दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड प्रल्हाद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रदर्शन नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, नव्या कायद्यात अंतर्भूत केलेले नवीन कलमे व त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायवैद्यक शास्त्राला प्रोत्साहन, साक्षीदारांचे सरंक्षण, लहान मुले व महिला सुरक्षा, मॉब लिन्चींग, संघटीत गुन्हे, दहशतवाद आणि देशविरोधी, पोलिसांच्या जबाबदारीमध्ये वाढ, न्यायाधीशाशी संबधित तरतुदी, अभियोजन संचालनालय, शैक्षणिक संस्थामध्ये शिकवले जाणार नवीन कायदे,काही महत्वाच्या गुन्ह्यांसाठी नवीन कायद्यामधील शिक्षेत वाढ आणि नवीन कायद्याविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती आदी विषयावरील माहिती मांडण्यात येणार आहे. प्रदर्शनामध्ये क्यू आर कोड स्कॅन लावण्यात येणार आहे. यामध्ये नवीन कायद्याची संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळणार आहे.
हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी, विधी अभ्यासक, पोलीस, वकील आणि नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे.