उद्योगात स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा – जिल्हाधिकारी आर. विमला

जिल्हा उद्योग मित्र समितीचा आढावा

उद्योग क्षेत्रास सर्व सुविधा द्याव्यात

नागपूर: जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत  विविध भागात उद्योग समुह विकसीत झाले आहेत. शहरालगतच्या बुटीबोरी, हिंगणा, वाडी  आदी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या उद्योग समुहाला महामंडळाने सर्वसोयीसुविधा पुरवाव्यात व शहराचे  मानांकन वाढवावे. या उद्योगामुळे कोविडमुळे रोजगारापासून वंचित झालेल्या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. उद्योग समुहाने स्थानिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फटाणे, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए.के. श्रीवास्तव, कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक एस.एस. मुद्दलवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्मिता खरपकर, दिलीप जोगावे, बीएमएचे सदस्य प्रशांत मेश्राम, प्र.के.पाटील, सुरेश राठी, योगेश धारार, रामेश्वर कुरंजेकर, रोहित अग्रवाल, श्री. मेहरकर, एम.एन कांबळे यावेळी उपस्थित होते.

वाडी औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया लवकरात लवकर कार्यान्वित करावी. जेणेकरुन तलावातील पाणी दुषित करण्यापासून मदत होईल. यासोबतच अंबाझरी तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करावी. अंबाझरीलगतच्या नाल्यावर एसटीपी बसविणे आवश्यक असल्याने नगरपंचायत वाडीबाबत जिल्हा परिषदेशी संपर्क साधून कामास गती दयावी. औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून प्रकरण सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हिंगणा औद्योगिक क्षेत्रात वाहतुक कमी करण्यासाठी बायपास रोड तयार करावा. त्यासाठी जिल्हा परिषद व महामंडळाने सामुहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात सीईटीपी आवश्यक असल्याची मागणी औद्योगिक संघटनेने केली आहे. याकामाकरीता 12 कोटीचा निधी अपेक्षित असून संघटना 25 टक्के निधी देण्यास तयार आहे. महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाने  उर्वरित  निधी प्राप्त करावा व  बायपास लवकरात लवकर होईल या विषयी कार्यवाही करुन शासनास प्रस्ताव पाठवावा. असे त्या म्हणाल्या.

बुटीबोरी व हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापनबाबत मार्ग काढावा. त्याचा लाभ औद्योगिक क्षेत्रात होऊन रोजगार निर्मितीस मदत होईल. हिंगणा औद्योगिक क्षेत्रात ईसीस हॉस्पिटल सुरु करावे. जेणेकरुन कामगारांना आरोग्याच्या सुविधा देणे व रुग्ण कामगारांना वेळीअवेळी भरती करणे  सोयीचे होईल,असे त्यांनी सांगितले. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते पावसाळापूर्वी दुरुस्त करण्याच्या सूचना औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.

बुटीबोरी येथे 200 खाटाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच कामगाराच्या सोयीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सदस्यांनी  यावेळी सांगितले. हॉस्पिटल शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या सोसायटीद्वारे चालविण्यात येणार असून कॅशलेस प्रणालीचा वापर होणार आहे. हिंगणा क्षेत्रासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल संलग्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर सुधार प्रन्यासतर्फे  अवाजवी कर वसूलीबाबत औद्योगिक संघटनेने निवेदन दिले असता याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठवून संघटनेला दिलासा देण्यात येईल. जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक महिन्यातून एका बुधवारी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे 10 लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीनी  या कार्यास खारीचा वाटा म्हणून सढळ हाताने जास्तीत जास्त ध्वनदिन निधी जानेवारी 2022 पर्यंत जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

या बैठकीस जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कर्मियों की सेफ्टी हमारी सर्वोच्च प्राथमिकता - श्री मनोज कुमार

Thu Dec 23 , 2021
वेकोलि त्रिपक्षीय सुरक्षा समिति की 48 वीं बैठक सम्पन्न  नागपुर – “कम्पनी – कर्मियों की सेफ्टी (सुरक्षा) प्रबंधन की सर्वोच्च प्राथमिकता है। कोयला-उत्पादन एवं प्रेषण या अन्य कार्यों के दौरान हर कर्मी की सेफ्टी का हमें ध्यान रखना है। टीम वेकोलि के हर सदस्य की जान कीमती है। अगर कहीं कुछ कमी है, तो उसे तुरत दूर किया जायेगा। “ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com