नागपूर :- वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. कामाचे योग्य नियोजन करून शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व अचूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.
सन 2021-22 या वर्षासाठी संचालनालयाकडून नागपूर येथे नुकतेच तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे जिल्हा कार्यालयांतर्गत उपक्षेत्र काम करणारे कर्मचारी असे एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले. या कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना संचालक आहेर बोलत होते.
संचालक आहेर पुढे म्हणाले की, वार्षिक उद्योग पाहणी (Annual Survey of Industries) हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) आकडेवारीचा महत्त्वपूर्ण प्रमुख स्त्रोत आहे. वार्षिक उद्योग पाहणीतील आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी तसेच उद्योगविषयक धोरण निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील माहितीचे समन्वयन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून करण्यात येते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली. महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होण्यासाठी पाहणीचे काम अतिशय महत्वाचे असल्याचे सांगून यासाठी उद्योग विभागाकडून सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रीय सांख्यिकी उपमहासंचालक सौम्या चक्रवर्ती यांनी बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वाधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहित वेळेत संकलित करून उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यशदाचे महासंचालक चोकलिंगम यांनी देशातील सर्वेक्षणाचा, माहितीचे महत्त्व, त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित – अनपेक्षित परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. माहिती तंत्राज्ञानात होत असलेल्या, नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशीअल इंटीलिजन्स व मशिन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा विचार करून माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहसंचालक नवेन्दु फिरके, उपसंचालक रणबीर डे, बाप्पा करमरकर उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक डॉ. प्रदिप आपटे, अपर संचालक डॉ. जितेंद्र चौधरी, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी पुष्कर भगुरकर, यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लीनाथ कलरोही यांनी मार्गदर्शन केले.