देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी उद्योग व सार्वजनिक उपक्रमांनी योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

– सामाजिक दायित्व तरतुदीमुळे दहा वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

मुंबई :- कॉर्पोरेट्स व उद्योग क्षेत्रासाठी कायद्याद्वारे आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये सामाजिक दायित्व निधीतून शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य झाले आहे. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची स्थिती सुधारणे आवश्यक असून या क्षेत्राकडे देखील उद्योग व सार्वजनिक उपक्रमांनी तातडीने लक्ष द्यावे असे सांगताना भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी उद्योग व सार्वजनिक उपक्रमांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी आज येथे केले.

कॉर्पोरेट सामाजिक दायित्व तरतूद अंमलात येण्यास दहा वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सामाजिक दायित्व निधीतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योग समूह तसेच सार्वजनिक उपक्रमांचा राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २७) राजभवन मुंबई येथे ‘सीएसआर एक्सलन्स’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, भारतीय सीएसआर दशकपूर्ती समारोह समितीचे अध्यक्ष डॉ हुझेफा खोराकीवाला, निवृत्त भाप्रसे अधिकारी डॉ भास्कर चटर्जी तसेच विविध उद्योग व सार्वजनिक उपक्रमांचे प्रमुख व सीएसआर प्रतिनिधी उपस्थित होते.

उद्योगांनी आपल्या लाभांशाच्या दोन टक्के निधी सामाजिक कार्यावर खर्च करण्याची कायदेशीर तरतूद जरी एक दशकापूर्वी कायद्यात अंतर्भूत करण्यात आली असली तरी उद्योगांच्या माध्यमातून समाजकार्य करण्याची परंपरा देशात फार जुनी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. टाटा, बिर्ला, बजाज व अनेक उद्योग समूहांनी उद्योग स्थापनेपासूनच सामाजिक कार्य देखील सुरु केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मुंबईतील दानशूर लोकांच्या दातृत्वातून अनेक सार्वजनिक संस्था, हॉस्पिटल, वाचनालये व स्मशान भूमी निर्माण झाल्या असल्याचे सांगून ही परंपरा पुढेही सुरु ठेवण्याची जबाबदारी उद्योग समूहांची असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट सामाजिक दायित्वासोबतच लोकांनी वैयक्तिक सामाजिक दायित्व केल्यास समाजातील सर्व वर्गाच्या लोकांचा जीवन स्तर उंचावण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कॉर्पोरेट्स व सार्वजनिक उपक्रमांना प्रशिक्षित मनुष्यबळ गरजेचे असून कुलपती या नात्याने आपण विद्यापीठांना कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यास सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले.

सामाजिक दायित्व ही तरतूद न राहता संस्कृती व्हावी – कैलाश सत्यार्थी

कृत्रिम बुद्धिमत्ते ऐवजी करुणात्मक बुद्दी विकसित करावी

जग आज पूर्वीपेक्षा अधिक संपन्न आहे. परंतु वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनात मनुष्य अधिक दुखी आहे. संपर्क – संवाद साधने वाढत असताना एकटेपण ही समस्या वाढत आहे असे सांगून कृत्रिम बुद्धिमत्ते ऐवजी करुणात्मक बुद्धी विकसित केल्यास जगातील अनेक समस्या सुटतील असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी यावेळी बोलताना केले. 

इतरांचे हित करण्याची संस्कृती भारतीय समाजमनात अनादी काळापासून रुजलेली आहे. शंभर हातांनी कमवा परंतु हजार हातांनी दान करा असा विचार या देशाने दिला आहे. त्यामुळे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व ही कायदेशीर तरतूद न राहता ती संस्कृती झाली पाहिजे असे सत्यार्थी यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष नादीर गोदरेज व ‘कोल इंडिया’च्या सीएसआर प्रमुख रेणू चतुर्वेदी यांचा सत्कार करण्यात आला.

अजंता फार्मा, एलआयसी, गेल इंडिया, हिंदुस्थान लिवर, महिंद्रा अँड महिंद्रा, नवनीत प्रकाशन, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधींचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ भास्कर चटर्जी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘भारतीय CSR के दस साल : अगले दस साल बेमिसाल’ या पुस्तकाच्या आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन CSR वन डिकेड सेलिब्रेशन कमिटी’ या संस्थेतर्फे करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Sudha distributes 800 food packages to patients everyday in Medical Hospital 

Mon Jul 29 , 2024
Nagpur :- For the past 8.5 years and without a single day’s break, Sudha Agrawal has been distributing food to patients, their caretakers and even to the stray animals. With the steadfast support of her team of nine people and her family, Sudha distributes food in Government Medical College & Hospital, Rashtrasant Tukdoji Regional Cancer Hospital and Snehanjali Centre For […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com