77 व्या कान चित्रपट महोत्सवात एफटीआयआयच्या विद्यार्थ्याने पटकावला ‘ला सिनेफ’ पुरस्कार

– एफटीआयआय चे विद्यार्थी चिदानंद एस नाईक (दिग्दर्शक) आणि त्यांच्या चमूच्या “सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो “ चित्रपटाने कानमध्ये केली चमकदार कामगिरी.

– चिदानंद एस नाईक – ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ पैकी एक आणि एफटीआयआय च्या 2022 च्या तुकडीतील विद्यार्थी

नवी दिल्ली :- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे विद्यार्थी असलेल्या चिदानंद नाईक यांच्या “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो”, या चित्रपटाला फ्रान्समधील 77 व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी कानचा ‘ला सिनेफ’ पुरस्कार मिळाला आहे. विजेत्याची अधिकृत घोषणा 23 मे 2024 रोजी झालेल्या महोत्सवात करण्यात आली. या कार्यक्रमात एफटीआयआय चे विद्यार्थी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक चिदानंद नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन चिदानंद एस नाईक यांनी केले आहे, सूरज ठाकूर यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे तर मनोज व्ही यांनी संकलन केले आहे आणि अभिषेक कदम यांनी ध्वनीमुद्रण सांभाळले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळत आहे, विशेषत: एफटीआयआय ने कानमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून गेल्या काही वर्षांमध्ये या महोत्सवात या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे चित्रपट दाखवले जात आहेत. 73 व्या कान चित्रपट महोत्सवामध्ये ‘कॅटडॉग’ या एफटीआयआय च्या विद्यार्थ्याच्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर चार वर्षांनी नाईक यांच्या चित्रपटाला सन्मान मिळाला आहे. 77 व्या कान चित्रपट महोत्सवात भारतातून विविध श्रेणींमध्ये अनेक प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या. पायल कपाडिया, मैसम अली, संतोष सिवन, चिदानंद एस नाईक आणि त्यांचा चमू यासारख्या एफटीआयआय च्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवामध्ये स्वतःची चमक दाखवली.

“सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो”, ही एका वृद्ध स्त्रीची कथा आहे जी गावातील कोंबडा चोरते, आणि त्यामुळे स्थानिक समाजात गोंधळ उडतो. तो कोंबडा परत मिळवण्यासाठी, वृद्ध महिलेच्या कुटुंबाला वनवासात पाठवण्याची भविष्यवाणी केली जाते.

हा एफटीआयआय चित्रपट दूरचित्रवाणी विभागाच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची निर्मिती आहे, जिथे दिग्दर्शन, इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी, संकलन आणि ध्वनी यासारख्या विविध विभागातील चार विद्यार्थी एका प्रकल्पासाठी एकत्र येऊन वर्षाच्या शेवटी समन्वयित सराव म्हणून काम करतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिदानंद एस नाईक यांनी केले आहे, सूरज ठाकूर यांनी छायाचित्रण तर मनोज व्ही यांनी संकलन केले आहे, आणि अभिषेक कदम यांनी ध्वनीमुद्रण सांभाळले आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंतिम वर्षाच्या समन्वयित सरावाचा भाग म्हणून या चित्रपटावर काम केले होते आणि ते 2023 मध्ये एफटीआयआय मधून उत्तीर्ण झाले होते.

एफटीआयआय च्या एका वर्षाच्या दूरचित्रवाणी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा चित्रपट प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात निवडला जाण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2022 मध्ये एफटीआयआय मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, चिदानंद एस नाईक यांची 53 व्या इफ्फीमध्ये 75 क्रिएटिव्ह माइंड्सपैकी एक म्हणून निवड करण्यात आली होती. क्रिएटिव्ह माइंड्स हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट क्षेत्रातील नवोदित तरुण कलाकारांना ओळख मिळवून देणारा आणि त्यांना पाठिंबा देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर. माधवन यांनी चित्रपटाच्या संपूर्ण विद्यार्थी चमूचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “चिदानंद नाईक आणि ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो’ च्या संपूर्ण चमूचे हा अत्यंत प्रतिष्ठित सन्मान मिळविल्याबद्दल अभिनंदन.

विलक्षण ओळख आणि प्रेम यासह झळाळत्या करिअरचा हा शुभारंभ रहावा. तसेच, अशा जागतिक दर्जाच्या प्रतिभेला सामोरे आणल्याबद्दल मी एफटीआयआय चे सर्व कर्मचारी आणि प्रशासन यांचे अभिनंदन करतो.”

नवीन कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि जगभरातील फिल्म स्कूलमधील चित्रपटांची दखल घेणे हा या महोत्सवाच्या ‘ला सिनेफ’ विभागाचा उद्देश आहे. जगभरातील 555 फिल्म स्कूलनी सादर केलेल्या एकूण 2,263 चित्रपटांमधून निवडलेल्या 18 लघुपटांमध्ये (14 ॲक्शन आणि 4 ॲनिमेटेड चित्रपट) निवड झालेला हा चित्रपट होता.

सिनेमा आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील एफटीआयआयचे अनोखे अध्यापनशास्त्र आणि सरावावर आधारित सह-शिक्षणाचा दृष्टिकोन आणि प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे संस्थेचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत. हे प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. एफटीआयआय,जगातील सर्वोत्कृष्ट फिल्म स्कूलमध्ये सर्वात उत्तम शैक्षणिक केंद्र आहे आणि आज भारताची मान त्याने अभिमानाने उंचावली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलिस आयुक्तालय नागपुर शहर तर्फे "एकत्र येऊया नशा मुक्त नागपुर घडवूया" कार्यक्रम संपन्न

Sat May 25 , 2024
नागपूर :- पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून नशा मुक्त नागपुर घडविण्याकरिता पोलिस आयुक्तालय नागपुर शहर व नुरी महफिल एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमानाने “एकत्र येऊया नशा मुक्त नागपुर घडवूया” कार्यक्रम दि. २४/०५/२०२४ चे १९:०० वा. दरम्यान एनएमसी ताजबाग हायस्कूल ठाकूर प्लॉट ग्राउंड मिनारा मस्जिद समोर, मोठा ताजबाग, नागपुर शहर या ठिकाणी पोलिस आयुक्त नागपुर शहर यांच्या अध्यक्षतेखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com