– नागपूर जिल्हा भाजपतर्फे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
नागपूर :- आमदार माजी होतात, खासदार माजी होतात, पण कार्यकर्ता कधीही माजी होत नाही. पद हे तात्पूरते आहे, पण कार्यकर्ता कायमस्वरुपी आहे. त्यामुळे पक्षाच्या विचारांशी बांधिलकी ठेवणाऱ्या, पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (रविवार) पदाधिकाऱ्यांना केले.
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. हुडकेश्वर मार्गावरील दीपलक्ष्मी सेलिब्रेशन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह आजी-माजी आमदार व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी यांनी सुरुवातीला नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचे अभिनंदन केले व त्यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुकही केले. ना. गडकरी म्हणाले, ‘पक्ष सत्तेत नसतानाही असंख्य कार्यकर्त्यांनी काम केले. काही कार्यकर्त्यांनी कुठल्याही पदावर नसताना जनतेचे प्रेम मिळवले. समाजात प्रतिष्ठा प्राप्त केली. त्यांच्यामुळे आज पक्षाचा चांगले दिवस बघता येत आहेत. कार्यकर्त्यांची विचारांशी कटिबद्धता असेल आणि पक्षाशी बांधिलकी असेल तरच मोठे राजकीय यश मिळणे शक्य असते.’ जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात मिळविलेले स्थान कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार मनात ठेवा आणि आपल्या कार्यकर्त्याला कुटुंबाचा सदस्य समजा, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी अध्यक्षांचेही मोठे योगदान
पक्षाच्या विस्तारासाठी यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी प्रामाणिक परीश्रम घेतले. आज पक्ष ग्रामीणमध्येही मजबूत स्थितीत आहे, याचे श्रेय त्यांनाही जाते, या शब्दांत माजी जिल्हाध्यक्षांच्या योगदानाचा ना. गडकरी यांनी गौरव केला. मनात आत्मविश्वास ठेवून, संघटनेवर आणि विचारांवर अमर्याद प्रेम करून लढा आणि आनंदाने काम करा, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.