शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमाना भेट
नागपूर :- ‘हाथी-घोडा-पालखी… जय कन्हैयालाल की…’ या जयघोषात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी एकोप्याने राहत दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला वाटून समाजात प्रेमभावना वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवस्थी नगर, कमाल चौक, कोतवाली तसेच शारदा चौक येथील दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली. यावेळी त्यांनी मंचकावरील दहीहंडी श्रीफळाने फोडून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करण्याचे तसेच गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचतांना सुरक्षेची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही केले. आमदार प्रवीण दटके व संबंधित मंडळाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.