– अद्यावत कौशल्याद्वारे युवकांनी आत्मनिर्भर व्हावे – खासदार सुनील मेंढे
भंडारा :- भारत हा प्रचंड मनुष्यबळ क्षमतेचा देश आहे. कुशल प्रशिक्षणाची जोड देऊन युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात.रोजगार देणारे प्रशिक्षण घेतल्यास लवकर आर्थिक स्वावलंबन प्राप्त होऊन युवक -युवती आत्मनिर्भर होऊ शकतात. म्हणून जिल्ह्यातील या आठ रोजगार केंद्राचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचे ध्येय युवक युवतींनी साध्य करावे असे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी आज केले.
नागपूर रोडवरील मंगलम सभागृहात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य पद्धतीने जिल्ह्यातील आठ केंद्रांचे उद्घाटन झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास निरज मोरे ,शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, तहसीलदार विनिता लांजेवार, गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे उपस्थित होत्या.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी , नागरिक, शासकीय, अधिकारी-कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
युवक युवतींनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली . जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त कार्यालयतर्फे आठही केंद्रांवर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मंगलम सभागृहात झालेली आहे या कार्यक्रमाचे मुख्य अधिकारी म्हणून कवाडे यांनी काम पाहिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत राज्यात एकूण ५११ ग्रामपंचायतीची निवड करण्यात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ८ ग्रामपंचायतीअंतर्गत प्रशिक्षण केंद्राची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदविकाधारकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावात, उद्योग व्यवसायाची सुरुवात कशी करायची याचा मूलमंत्र मिळत असल्याबद्दल तरुणांनी आनंद व्यक्त केला आहे. जागतिकीकरणाच्या बदलत्या युगात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. अशा बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला गावाच्या कक्षेमध्ये आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया तरुणांनी यावेळी दिल्या.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात तीन प्रशिक्षण संस्थांद्वारे 800 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
तत्पूर्वी ,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्ह्यांतील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ झाला.