यवतमाळ :- अन्न व औषध प्रशासनच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते आज आभासी पद्धतीने पार पडले. 8 कोटी 15 लक्ष रुपये खर्च करून ही ईमारत बांधण्यात आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.मदन येरावार होते. प्रमुख अतिथी म्हणुन अन्न व औषध प्रशासन आयुक्त आभासी पदधतीने तर नागपूर विभागाचे सह आयुक्त कृ.रं.जयपुरकर, अकोला येथील सहाय्यक आयुक्त सं.मो.राठोड, अमरावती येथील अन्न सुरक्षा अधिकारी ग.वा.गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी घ.पं.दंदे, औषध निरीक्षक स.भा.दातीर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आ.मदन येरावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ईमारतीमुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनचे काम अधिक गतीमान व पारदर्शक होईल, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी नवीन प्रशस्त ईमारतीची पाहणी केली.
सदर नवीन इमारतीचे ३ हजार ७१० चौरस मिटर भुखंडावर पळसवाडी पोलिस वसाहतीमागे प्रशस्त बांधकाम करण्यात आले आहे. नवीन इमारतीच्या बांधकामास शासनाने एकुण रुपये ८ कोटी १५ लाख ४४ हजाराचा निधी मंजूर केला होता. या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्ह्यातील अन्न व्यावसाईक, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त गो.वि.माहोरे यांनी केले. संचालन अन्न सुरक्षा अधिकारी सी.रा.सुरकर यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त मि.कृ.काळेश्वरकर यांनी मानले.