बुधवार बाजारातील मनपाच्या स्मार्ट स्वच्छतागृहाचे लोकार्पण

हीरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, इन्सिनरेटर, व्हिल चेअर व अनेक सुविधा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे सक्करदरा येथील बुधवार बाजार परिसरातील प्रसाधनगृहाचा कायापालट करून तिथे स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात आले आहे. हनुमान नगर झोन अंतर्गत बुधवार बाजारातील या ‘स्मार्ट स्वच्छतागृहाचे’ मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि स्थानिक सफाई कर्मचा-याच्या हस्ते रविवारी (ता.१६) लोकार्पण झाले.

याप्रसंगी हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, नागपूर@२०२५ चे प्रमुख शिवकुमार राव देवेन्द्र भोवते आदी उपस्थित होते.

स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, हँड ड्रायर अशा अनेक सुविधांनी सज्ज असे ‘स्मार्ट स्वच्छतागृह’ नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाला सेन्सारवर आधारित स्मार्ट प्रवेशद्वार असून ते उघडण्याची वा बंद करण्याची गरज नाही. स्वच्छतागृहामधील सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकून एक पॅड मिळविता येते. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्याकरिता येथे सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर सुद्धा लावलेले आहे. हँड ड्रायर, वॉश बेसिनची महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे.

पुरूषांच्या स्वच्छतागृहामध्ये चार मुतारी, कमोड व साधे शौचालय आणि बाथरूम आहे. दिव्यांगांकरिता स्वतंत्र कमोड शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहामध्ये व्हिल चेअरची व्यवस्था आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आलेले आहेत.

सक्करदरा येथील बुधवार बाजार परिसरातील मनपाच्या या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये मुतारीचा वापर नि:शुल्क असून शौचालयाच्या वापरासाठी ७ रुपये, थंड पाण्याने आंघोळीसाठी २० रूपये आणि गरम पाण्याने आंघोळीसाठी ३० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. स्मार्ट स्वच्छतागृहाची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणा-या कर्मचा-यासाठी खोली तयार करण्यात आलेली आहे.

नागपूर शहरामध्ये एकूण चार स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. यापैकी गोकुळपेठ आणि बुधवार बाजार येथील स्वच्छतागृह नागरिकांच्या सुविधेसाठी खुले करण्यात आले आहे. तर सुगतनगर आणि कळमना येथील स्वच्छतागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, गोकुळपेठ, बुधवार बाजार आणि सुगतनगर येथील स्वच्छतागृहांचा कायापालट करून येथे स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. तर कळमना येथे पूर्णत: नवीन बांधकाम करून स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात येणार आहे. या चारही स्वच्छतागृहांकरिता १.५ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे.

नागपूर शहरामध्ये आणखी स्मार्ट स्वच्छतागृहांची निर्मिती व्हावी याकरिता मनपाद्वारे शासनाला सात स्मार्ट स्वच्छता गृहांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) पाठविण्यात आलेला आहे. सात ठिकाणी तयार होणा-या स्मार्ट स्वच्छतागृहांमध्ये एकूण ८४ शौचालय, २५ बाथरूम, ७९ मुतारी, ७ हिरकणी कक्ष, ७ देखरेख कर्मचारी खोल्या आणि १४ दुकाने प्रस्तावित आहेत. फुटाळा, मानकापूर, मंगळवारी बाजार, रहाटे कॉलनी चौकातील गोरक्षण सभा जवळ, पारडी दहन घाटाजवळ, गांधीबाग कपडा बाजार आणि सतरंजीपुरा येथील मनपाचे जुने कार्यालय या सात ठिकाणच्या प्रस्तावित स्मार्ट स्वच्छतागृहांकरिता ५९९.०७ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चातील २५ टक्के म्हणजे १४९.७७ लक्ष रुपये केंद्र सरकार, ३५ टक्के अर्थात २०९.६८ लक्ष रुपये राज्य सरकार आणि उर्वरित ४० टक्के म्हणजेच २३९.६२ लक्ष रुपये मनपा खर्च करणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : विद्युत खांबावर विना परवानगी बॅनर विरोधात कारवाई

Mon Apr 17 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.17) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com