– योग शिक्षिका पद्मिनी जोग यांनी सादर केले प्रात्यक्षिक
नागपूर :- योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते. योगासनामुळे शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योगा निरंतर करीत राहावे. शांतीतून मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहते, असे आवाहन योग शिक्षिका पद्मिनी जोग यांनी केले.
आरोह संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित “स्नेहमिलन आणि प्रदर्शन” रंगोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आरोहच्या विश्वस्त विशाखा राव, शर्मिष्ठा गांधी, सचिव डॉ. आशिष शहाणे, ट्रिपल आयटीचे पारुळकर यांची उपस्थिती होती. राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौकाजवळ, नागपूर येथे दि.९, १० व ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
यावेळी पद्मिनी जोग यांनी योग व प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी त्यांचा उत्साह आणि ऊर्जा नवं तरुणांना लाजवेल, असा होता. या वयातही पद्मिनी जोग यांनी योग शिकवण्याचे काम नित्य नेमाने सुरू ठेवले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून त्या योग साधना करत असून त्यांनी आतापर्यंत ९३१ योग शिबिरांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख सैन्य अधिकारी, जनावांनाना योग धडे दिले आहेत.
यावेळी पद्मिनी जोग यांनी सांगितले की, श्वासोच्छ्वास हा योगाभ्यासाचा मुख्य घटक आहे. योगाभ्यास केल्याने फुफ्फुसाची क्षमता आणि श्वासोच्छवासाची कार्यक्षमता सुधारू शकते. हे विशेषतः अस्थमासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि योगाभ्यास केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते, हे त्यांनी उदाहरणासह सांगिलते.
आरोहच्या विश्वस्त विशाखा राव जठार- प्रास्ताविक भाषण केले. आर्या चव्हाण या तरुणीने “इतनी शक्ति हमें देना दाता; मन का विश्वास कमज़ोर हो ना'” हे स्वागत नृत्यगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन नसरीन शमीम अन्सारी यांनी केले, तर मान्यवरांचे आभार मिलका ढोरे यांनी मानले.
प्रदर्शनात ऑरगॅनिक होळी रंग, एप्रोंस, ब्लॉक प्रिंटेड स्टोल्स, स्कर्ट्स, कुशन कवर्स, बॅग, डायरी,फाईल्स, पेन स्टँड, वॉलेट्स, बेबी वेअर्स, मॅटरनिटी वेअर्स, फीडिंग गाऊन, साडी कव्हर्स, कॉन्फरन्स फाईल्स इत्यादी वस्तू आहेत.
*सांस्कृतिक कार्यक्रमात थिरकल्या महिला*
उद्घाटन सोहळ्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाडी आणि महाल सेंटरच्या महिला सदस्यांनी गोंडी गीत, मंगलागौर सादर केले. आरोह हिरकणी महिला क्लस्टर कडून आत्मनिर्भरता यावर पथनाट्य सादर करण्यात आले. आरोह संस्थेच्या माध्यमातून शहरी पर्यावरण ही संकल्पना देखील राबविण्यात येत आहे. त्या रोपवाटिकेचेदेखील प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे.
*रविवारी गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन*
रविवार,दि.१० मार्च,२०२४ रोजी दुपारी १ ते ३ या दरम्यान गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “गर्भसंस्कार” या कार्यक्रमात गर्भवती महिलांसाठी व ज्यांची माता होण्याची इच्छा आहे, त्या स्त्रीवर्गासाठी गर्भसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये योगाचे महत्त्व याबद्दल पद्मिनी जोग मार्गदर्शन करतील. गरोदरपणातील आहार, विहार, सुविचार व गर्भावर होणारा त्याचा परिणाम याबद्दल विवेचन व मुख्य मार्गदर्शन नीलिमा पाठक करतील. डॉ.विशाखा जोगदंड (स्त्रीरोग तज्ञ) व अलका जोग ह्यांची विशेष उपस्थिती असेल. गर्भसंस्कार शिबिर विनामूल्य आहे. नोंदणी करणे आवश्यक आहे.